
भारताने पाकिस्तानशी युद्ध पुकारले ते नेमके कशासाठी? युद्ध पुकारले ते पूर्णत्वास नेले नाहीच, पण अमेरिका व्यापार बंद करेल या धमकीनंतर शस्त्रसंधी करून आपण मोकळे झालो. हे सर्व पंडित नेहरू यांनी नाही, तर आपले सध्याचे पंतप्रधान मोदी यांनी केले. देश, सैन्य व जनतेशी त्यांनी इमान राखले नाही.
कोणताही निकाल न लावता 2025चे भारत-पाक युद्ध आपले 56 इंच छातीवाले पंतप्रधान मोदी यांनी संपवले आहे. मोदी, अमित शहा व राजनाथ सिंह मिळून आता पाकव्याप्त कश्मीर भारतात आणतीलच. लाहोर, कराचीलाही धडक देतील अशी हवा जोरदार आधी निर्माण केली; पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर हे राजकारणी पादऱ्या पावट्यांसारखे वागले. त्यांनी आपल्या सैन्याच्या उत्साहावर पाणी टाकले. भारतीय इतिहासात या घटनेची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल. “घरात घुसून मारू” अशा आवेशात पंतप्रधान लढायला उतरले तेव्हा देशातला सर्व विरोधी पक्ष मोदींच्या पाठी ठामपणे उभा राहिला. “घरात घुसून मारा, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे सगळ्यांनी जाहीर केले; पण प्रे. ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणून युद्ध थांबवल्यावर मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. जवानांचे कौतुक केले व पुन्हा गर्जना केली “पाकिस्तानच्या घरात घुसून मारू.” हा मोठा विनोद आहे. पंतप्रधान गोंधळले आहेत. घरात घुसून मारण्याची संधी असताना माघार घेतली व आता पुन्हा मारण्याची भाषा करीत आहेत. मोदींकडून शौर्याचे असे काहीच घडत नाही. अमेरिकेसोबतच्या व्यापाराच्या बदल्यात पाकड्या दहशतवाद्यांना सरळ अभय दिले. सैन्याचा अवसानघात केला व पुन्हा सैन्याचा विजय मेळावा घ्यायला गेले. मोदी यांनी राष्ट्रहितासाठी दोन गोष्टी आता कराव्यात. पहलगाम हल्ल्यास जबाबदार म्हणून गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्याचे शौर्य तरी दाखवावे व देशावर मेहेरबानी म्हणून त्यांनीही पंतप्रधानपदाचा त्याग करावा. इतकी नाचक्की आपल्या देशाची या काळात झाली. मोदी हे इंदिरा गांधींवर मात करण्यासाठी गेले; पण त्यांना व्ही.पी. सिंग आणि मोरारजी देसाईदेखील होता आले नाही. 26 भगिनींच्या कुंकवाचा बदला त्यांनी घेतला नाही व प्रे. ट्रम्प यांचा उंट भारताच्या तंबूत घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या वल्गना करून काहीच मिळवले नाही. पाकव्याप्त कश्मीरचे एक गाव जरी त्यांनी ताब्यात घेतले असते तरी नव्या महाभारतास काही अर्थ राहिला असता, पण शस्त्रसंधीचे श्रेयही प्रे. ट्रम्प यांनी घेतले. आता देशाच्या लक्षात आले की, भारतीय पंतप्रधानांच्या सिंहासनावर प्रे. ट्रम्प यांच्या पादुका ठेवून हे राज्य करीत आहेत. मोदींनी युद्ध थांबवण्याच्या बदल्यात निदान दोनेक साध्या गोष्टी तरी पाकड्यांकडून मान्य करायला हव्या होत्या.
– पाक तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांची सुटका.
– पाकिस्तानच्या कैदेत भारताचे 565 मच्छीमार सडत आहेत. त्यांची तत्काळ सुटका.
निदान हे एवढे तरी उपकार भारतीय जनतेवर मोदींनी करायला हवेच होते. त्यापैकी काहीच झाले नाही व युद्धविराम (ट्रम्पकृत) स्वीकारल्यावर आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर दिल्लीत बसून पाकला सांगतात, ”पाकव्याप्त कश्मीर सोडा. भारताला द्या.” हे आक्रित आहे. संधी असताना घरात का घुसले नाहीत व आता सर्व आवराआवर झाल्यावर पुन्हा घरात घुसण्याचे बोलायचे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. भारतीय जनता पक्षाचा एक निराश झालेला खासदार या काळात भेटला. तो म्हणाला, ”हे लोक पाकिस्तानचे तुकडे करू शकले नाहीत. त्यांना फक्त विरोधी पक्षांचे तुकडे करणेच जमले. त्यांनी पक्ष फोडले. पाकिस्तान फोडण्याचा प्रसंग उभा ठाकला तेव्हा मागे हटले. देशाची बेअब्रू झाली.” बहुसंख्य जनतेचे हेच मत आहे. तुम्ही फक्त जागांची नावे बदलू शकता. देशाचा भूगोल बदलण्यासाठी इंदिरा गांधींप्रमाणे वाघाचे काळीज पाहिजे. मोदी हे आपली 56 इंचाची छाती राजकीय प्रचार सभांत ठोकत राहिले. प्रत्यक्षात तो माचिसचा रिकामा खोका निघाला हे आता लोकांचे मत बनले. प्रे. ट्रम्प व्यापार बंद करण्याची धमकी देतात म्हणून पंतप्रधान मोदी पाकिस्तानशी युद्ध थांबवतात. प्रे. ट्रम्प यांच्या दबावामुळे युद्ध थांबवले हे सांगायला मोदी घाबरले. भारताला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी यांनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. हे कसले लक्षण? ही कसली भीती? देशाला समजले पाहिजे.
विदेश दौरे फुकट गेले
जगातला एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी जगभ्रमणावर आतापर्यंत 550 कोटी खर्च केले. 138 देशांत ते गेले. यापैकी एकाही देशाने विश्वगुरू मोदींना पाठिंबा दिला नाही. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत आमदारांची मते मिळावीत यासाठी नेते फोन करतात, त्याप्रमाणे परराष्ट्रमंत्री जयशंकर इतर देशांना पाठिंबा मागण्यासाठी फोन करीत होते, पण त्याचा उपयोग काहीच झाला नाही. मोदींना ‘विश्वगुरू’ उपाधी देणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. मोदींच्या विदेश यात्रा या त्यांच्या लाडक्या उद्योगपतींना कंत्राटे मिळावीत यासाठीच असतात. अशा व्यापारी राजाला जगात मान नसतो हे आता स्पष्ट दिसले. जे लोक या परिस्थितीतही मोदींचा उदोउदो करीत आहेत ते आपल्या देशाशी बेइमानी करत आहेत. मोदी लवकरात लवकर सत्तेवरून जाणे हे देशहिताचे आहे. मोदी व त्यांचे लोक आता भारताचे राहिले नसून ते प्रे. ट्रम्प व त्यांच्या व्यापार मंडळाचे झाले आहेत. या सगळ्यात देशहिताचा सरळ सौदा झाला.
अदानीचा शेअर्स वाढला
भारत-पाक शस्त्रसंधीनंतर कोसळलेल्या अदानी शेअर्सचा भाव वधारला. जागतिक मीडियाने या काळात भारताच्या प्रतिमेस धक्का दिला. प्रे. ट्रम्प यांनी मोदी व पाक पंतप्रधानांना दम भरल्याचे सांगितले. अल जजिरा म्हणते, “भारताने सुरुवातीला शौर्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी भारत कमजोर असल्याचे दिसून आले.” आंतरराष्ट्रीय मीडियात युद्धबंदीनंतर पाकिस्तानातील विजयी जल्लोषाची चित्रे प्रसिद्ध झाली व जगात भारताची नाचक्की झाली. युद्धकाळात जागतिक प्रसिद्धी माध्यमांत भारताची योग्य प्रतिमा येणे गरजेचे आहे याची खबरदारी घेतली गेली नाही. भारतीय मीडियाचा सर्व झोत मोदींवर राहिला. लाहोर, कराची, रावळपिंडीवर भारताने विजय मिळवला असे आपला मीडिया सांगत राहिला. त्या रिपोर्टिंगची विदेशात चेष्टा झाली. त्या सगळ्यांचे जगात हसे झाले. पडद्यामागे चित्र वेगळे होते. सिंहासनावर प्रे. ट्रम्प यांच्या पादुका ठेवून भारतीय राज्यकर्ते धोरणे ठरवीत होते. सैन्य पुढे निघाले होतेच, पण सिंहासनावरील पादुकांनी मागे फिरण्याचे आदेश दिले. देशाचा हा घात झाला.
संरक्षण खात्याचे तज्ञ एस.पी. वैद्य म्हणतात, “एक भारतीय म्हणून मला इतकेच सांगायचे आहे की, आमच्या सैन्याला आणखी फक्त दोन-तीन दिवस मिळायला हवे होते. कारण पाकिस्तान गुडघे टेकण्याच्या स्थितीत होता.”
हे सत्य असेल तर देशाचा विश्वासघात कोणी केला?
@rautsanjay61