
दैनिक ‘सामना’चे शिर्डी, राहाता तालुक्यांचे वार्ताहर अशोक सदाफळ यांचे आज निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्यावर शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. अशोक सदाफळ यांच्या निधनाबद्दल शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
गेल्या 20 वर्षांपासून अशोक सदाफळ हे दैनिक ‘सामना’चे वार्ताहर म्हणून काम करीत होते. गेल्या आठवडय़ात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला राहाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येत खालावल्यामुळे त्यांना शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिक खालावली, यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
राहाता व शिर्डी येथील विविध प्रश्नांचा गाढा अभ्यास असणारे अशोक सदाफळ यांनी लेखणीच्या माध्यमातून विविध विषय हाताळले होते. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने झगडत होते. पत्रकारितेबरोबरच समाजकार्याचीसुद्धा त्यांना आवड होती. शिर्डीच्या ग्रामीण भागातील समस्या, शिर्डी देवस्थानचे प्रश्न, राहाता तालुक्याचा सर्वांगीण विकास यासाठी अशोक सदाफळ यांनी वेळोवेळी ‘सामना’च्या माध्यमातून लिखाण केले.




























































