
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या एरिना सबालेंकाने मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपली दमदार कामगिरी कायम राखली. अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या कोको गॉफला 6-2, 4-6, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह सबालेंकाने ‘सनशाइन डबल’ पूर्ण करत कारकीर्दीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
इगा स्विटेक हिच्यानंतर ‘सनशाइन डबल’ साध्य करणारी सबालेंका ही पहिली खेळाडू ठरली आहे. तसेच मियामी ओपनमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची किमया तिने साधली. याआधी अॅश्ली बार्टी आणि सेरेना विल्यम्स यांनीच अशी कामगिरी केली होती. एकाच हंगामात इंडियन वेल्स आणि मियामी स्पर्धा जिंकत ‘सनशाइन डबल’ पूर्ण करणारी सबालेंका पाचवी महिला खेळाडू ठरली. याआधी स्टेफी ग्राफ, किम क्लायस्टर्स, व्हिक्टोरिया अझारेंका आणि इगा स्विटेक यांनी ही कामगिरी केली होती.
तसेच 2000 नंतर वर्षातील पहिल्या चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारी एरिना सबालेंका ही चौथी खेळाडू ठरली आहे. याआधी मार्ंटना हिंगीस (2001), सेरेना विल्यम्स (2003) आणि व्हिक्टोरिया अझारेंका (2012) यांनी ही किमया साधली होती.
‘‘नंबर वन’चे सिंहासन बळकट!
एरिना सबालेंकाच्या कारकीर्दीतील 24 वा डब्ल्यूटीए एकेरी जेतेपद असून एकूण 30वे जेतेपद होय. यात चार एकेरी ग्रॅण्डस्लॅम, सहा दुहेरी तसेच 11 डब्लूटीए 1000 एकेरी किताबांचा समावेश आहे. सबालेंका गेल्या काही काळापासून जगातील अव्वल क्रमांकावर कायम असून, या विजयामुळे तिचे ‘नंबर वन’चे सिंहासन आणखी बळकट झाले आहे. आतापर्यंत तिने एकूण 83 आठवडे अव्वल स्थान भूषवले आहे. सोमवारी ती सलग 76 व्या आठवडय़ासाठी नंबर वन राहणार असून या कामगिरीत ती इगा स्विटेकचा विक्रम मागे टाकणार आहे, मात्र अॅश्ली बार्टीचा 114 आठवडय़ांचा विक्रम अजूनही क़ायम आहे, हे विशेष.


























































