
शबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी केल्याप्रकरणी विशेष तपास पथकांनी आणखी दोघांना अटक केली आहे. स्मार्ट क्रिएशनचे सीईओ पंकज भंडारी आणि गोवर्धन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोवर्धनचे कर्नाटकच्या बेल्लार येथे सोन्याचे दुकान आहे. याआधी त्रावणकोर देवस्वोम बोर्डचे माजी प्रशासकीय अधिकारी एस. श्रीकुमारलाही अटक केली आहे. केरळ हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर श्रीकुमार यांना अटक करण्यात आली आहे. तसेच टीडीबीच्या माजी सचिव एस. जयश्री यांचा अटकपूर्व जामीनही कोर्टाने फेटाळला आहे.
नव्या वर्षात निसानची नवी कार येतेय
निसान मोटर इंडिया नव्या वर्षात नवी कार लाँच करणार आहे. मार्केटमध्ये असलेल्या रेनो ट्रायबर, मारुती अर्टिगा, मारुती एक्सएल 6, किआ कॅरेन्स आणि किआ कॅरेन्स क्लाविस यांना टक्कर देणारी ही कार ग्रेव्हाईट नावाने लाँच केली जाणार आहे. जानेवारी महिन्यात या कारला लाँच केले जाणार असून मार्चपर्यंत कारची डिलिव्हरी केली जाणार आहे. या कारला 6 ते 9 लाख रुपयांच्या किमतीत लाँच केले जाऊ शकते. ग्रेव्हाईटचे सर्वात मोठे वैशिष्टय म्हणजे तिचा सब-4 मीटर आकार आहे. या कारमध्ये डिजिटल क्लस्टर आणि सुरक्षिततेसाठी 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्टये मिळू शकतात.
कॅनरासह चार बँकांकडून व्याजदरात कपात
आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांनी व्याजदरात कपात करायला सुरुवात केली आहे. एसबीआय, पीएनबी, कॅनरा आणि बँक ऑफ बडोदा या चार बँकांनी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कॅनरा बँकेने 8.25 टक्क्यांवरून कपात करून व्याजदर 8 टक्के केले आहे. पंजाब नॅशनल बँकेने 8.35 टक्क्यांवरून 8.10 टक्के केले आहे. एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने 7.90 टक्के केले आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने व्याजदर 8.10 टक्के केला आहे.
ऍपल कंपनी पहिला फोल्डेबल आयफोन आणणार
ऍपल कंपनी आपला पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी हा फोन आयफोन 18 या सीरीज सोबत आणणार आहे, असा दावा केला जात आहे. हा फोन पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने या फोनसंबंधी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, काहींनी या फोनची डिझाइन लीक केली आहे. फोल्डेबल आयफोनचा डिस्प्ले सॅमसंगच्या फोल्डिंग फोनच्या तुलनेत छोटा असेल. या फोनची किंमत दीड ते पावणे दोन लाखांपर्यंत असू शकते.
ब्रिटन विदेश मंत्रालयाची वेबसाईट हॅक
चीनच्या हॅकर्सने ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालय आणि त्यासंबंधी वेबसाईट हॅक केली. यानंतर हजारो वीजधारकांची माहिती चोरली. या हॅकिंगमागे चीनची स्टार्म 1849 नावाची कंपनी आहे, अशी माहिती समोर आली आहे. चिनी हॅकर्सच्या या कारनाम्याने लंडनमध्ये खळबळ उडाली आहे. या हॅकिंगमुळे ब्रिटनमधील सर्वसामान्यांना कोणतेही नुकसान पोहोचले नाही, असे सरकारमधील एका मंत्र्याने सांगितले. स्टार्म 1894 नावाच्या हॅकर्स संस्थेने 2024 मध्ये निवडणुकीत एक मोठी मोहीम सुरू केली होती. यात ब्रिटनमधील 4 कोटी मतदारांवर परिणाम झाला होता.
यरूशलममध्ये पोलिसांवर हल्ला, 13 जखमी
इस्रायलच्या यरुशलमच्या अल्ट्रा ऑर्थोडॉक्स (हरेदीम) यहूदी परिसरात जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 13 जण जखमी झाले आहेत. इस्रायली अधिकाऱयांनी एका सामान्य पार्किंग चालान कापण्याचा प्रयत्न केला. याला नागरिकांनी विरोध केला. बघता बघता जमाव जमला आणि त्यांनी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी चार आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. यावेळी जमावाने पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केली. संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर अंडे आणि दगड फेकले. यावेळी पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागला.
तटरक्षक दलाला ‘अमूल्य’ भेट!

हिंदुस्थान तटरक्षक दलाची समुद्री क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी आयसीजीएस जहाज ‘अमूल्य’ला शुक्रवारी नौदलाच्या ताफ्यात सामील केले. ‘अमूल्य’ जहाज हे समुद्र किनाऱयावर देखरेख आणि त्वरित कारवाईसाठी बनवण्यात आले आहे. या जहाजाचे नेतृत्व कमांडेट अनुपम सिंह यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
नव्या हेलिकॉप्टरला सलामी!

हिंदुस्थानी नौदलाने आयएनएस हंसा गोव्यात आयएनएएस 335 ऑस्प्रे स्क्वॉड्रनला ताफ्यात सामील केले. यावेळी एमएच-60 आर मल्टी रोल हेलिकॉप्टरची दुसरी स्क्वॉड्रनचे उद्घाटन केले. नवे हेलिकॉप्टर नौदलाच्या ताफ्यात सामील करताना पाण्याचा फवारा मारून सलामी देण्यात आली. यावेळी नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थिती होते.




























































