‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा सिक्वेल, सचिन पिळगावकर यांनी श्रींच्या चरणी अर्पण केली संहिता

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रदीप पटवर्धन, सुप्रिया पिळगावकर, विजय पाटकर, कुलदीप पवार, रिमा लागू, जॉनी लिव्हर, सुनिल तावडे, निर्मिती सावंत आणि गायक सोनू निगम यासारख्या तगडय़ा कलाकारांचा समावेश असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट 2007 मध्ये सुपरहिट ठरला होता. 18 वर्षांपूर्वी गाजलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचे चित्रिकरण गणपतीपुळे येथे झाले होते. या चित्रपटाची कथा गणपतीपुळेशी निगडित होती. वडिलांनी केलेला नवस राहून जातो आणि तो नवस फेडण्यासाठी चित्रपटाचा नायक येतो अशी ही कथा आहे. आता नवरा माझा नवसाचा -2 या चित्रपटाचा शुभारंभ होणार असून या चित्रपटाचे अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकतेच गणपतीपुळे येथे जाऊन गणपतीबाप्पांचे दर्शन घेतले आणि श्रींच्या चरणी या सिक्वेलची संहिता अर्पण केली. यावेळी चित्रपट निर्मितीची संपूर्ण टीम उपस्थित होती.