
सामना ऑनलाईन । येवला
महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधण्याची कला आत्मसात करून येवल्यातील श्रीकांत खंदारे यांनी आजपर्यंत अनेक राजकीय, सामाजिक तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकारांना फेटे बांधले आहेत. या कलाकाराला नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फेटा बांधण्याची संधी मिळाली. सचिनचे आग्रहाचे निमंत्रण मिळताच त्यांनी मुंबई गाठली. खंदारे यांनी सचिनच्या दुर्मिळ छायाचित्रांचा अल्बम दाखवून कौतुकाची थाप मिळवली.
काही दिवसांपूर्वीच श्रीकांत खंदारे याच्या फेटय़ाची कलाकुसर पाहण्यासाठी येवला शहरात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याचे मोठे बंधू नितीन तेंडुलकर, मीनाताई तेंडुलकर आले होते. त्यांना श्रीकांत यांचे फेटय़ाचे सादरीकरण व डिझाईन खूप आवडले. त्यावेळी तेंडुलकर कुटुंबीयांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे श्रीकांत हा सचिनचा खूप मोठा चाहता आहे तसेच सचिनला भेटण्याची त्याला खूप इच्छा आहे.
अखेर तो दिवस आला. मास्टर ब्लास्टर सचिनने स्वतः श्रीकांत याला फोन करून भेटण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारून श्रीकांत हा त्याची बहीण सारिका, बंधू सुरेश, वहिनी चित्रा यांच्यासोबत सचिन तेंडुलकर याच्या मुंबई येथील घरी आला. त्यावेळी सचिनची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यास फेटा बांधला. यावेळी श्रीकांत याने सचिनच्या अवघ्या जीवनपटातील फोटो प्रदर्शन रुपात मांडले. हे प्रदर्शन पाहून हे फोटो अतिशय दुर्मिळ असून ते माझ्याकडेदेखील नसल्याचे सांगून श्रीकांतचे सचिनने कौतुक केले.























































