सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने स्वत:वर गोळी झाडून संपवले आयुष्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री राहत्या घरी डोक्यात बंदुकीची गोळी मारुन आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या गणपती नगर येथील तो रहिवासी आहे. प्रकाश गोविंदा कापजे (37) असे त्याचे नाव असून तो आठ दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता.

सचिन तेंडुलकर याचा बॉडीगार्ड असलेला प्रकाश गोविंद कापडे याची एसआरपीएफ जवान म्हणून भरती करण्यात आली होती. पोस्टींगनंतर तो सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्ड म्हणून काम पाहत होता. तो 8 दिवसांच्या सुट्टीवर घरी गेला होता. दरम्यान मंगळवारी रात्री प्रकाश कापडे याने मध्यरात्री घरात स्वत:वर गोळी झाडली. सगळे झोपेत असताना अचानक फायरिंगचा आवाज आल्याने सगळ्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रकाश याच्या पश्चात आई वडिलांसह पत्नी आणि दोन मुलं आहेत. सर्वांना प्रकाशच्या आत्महत्येने धक्का बसला आहे. कोणालाच त्याने हे टोकाले पाऊल का उचलले याबाबत माहित नाही. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर किरण शिंदे आणि त्यांच्या पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरु आहे.