…तर मुंबई क्रिकेटचा विकास होईल, सचिन तेंडुलकरच्या ‘एमसीए’ला सूचना

sachin-tendulkar

‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने मुंबईतील क्रिकेटमध्ये सुधारणा आणण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) नव्या कार्यकारिणीला काही सूचना केल्या आहेत. गुरुवारी जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत सचिन तेंडुलकर याने काही महत्त्वाच्या मुद्यांवर दृष्टिक्षेप टाकला. यामध्ये मुंबईतील शालेय स्तरापासून रणजी क्रिकेटपर्यंतच्या सर्वच विषयावर चर्चा झाली. मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी शिस्त व पारदर्शकता महत्त्वाची भूमिका बजावेल असे सचिन तेंडुलकरकडून यावेळी सांगण्यात आले. अशी माहिती अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडून देण्यात आली.

महिला क्रिकेटपटूंना सर्वोत्तम सुविधा द्या

पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटवरही लक्ष केंद्रित करायला हवे. त्यांच्या स्पर्धाही वाढवायला हव्यात. तसेच महिला क्रिकेटपटूंनाही सर्वोत्तम सुविधा द्यायला हव्यात. टॉयलेट, चेजिंग रूम या महत्त्वाची गोष्टींची उत्तम सुविधा असलेल्या स्टेडियममध्येच त्यांचे सामने खेळवावेत, असे सचिन तेंडुलकरने सांगितले.

बीसीसीआयच्या स्पर्धांनुसार वेळापत्रक निश्चित करावे

बीसीसीआयचा वर्षाचा कार्यक्रम पाहूनच मुंबईतील स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करावे. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या स्पर्धांमध्येही आपला फॉर्म कायम ठेवता येईल आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुंबईला जेतेपद पटकावता येईल ही सूचनाही यावेळी देण्यात आली.

यावरही एक नजर

  • एमसीएकडून शालेय स्पर्धांचे आयोजन व्हावे.
  • पायाभूत सुविधांवर जोर द्यावा.
  • छोटय़ा गटातील खेळाडूंना मोठय़ा स्टेडियममध्ये खेळण्याची संधी द्यावी.
  • आंतर क्लब गटातील सामन्यांमध्ये किमान एक खेळाडू 19 वर्षांखालील संघाचा असावा.
  • रणजी जिंकून गतवैभव मिळवण्यासाठी योजना असाव्यात.
आपली प्रतिक्रिया द्या