फॅक्चर हात, तरीही दिली साथ; गुरशरणच्या जिद्दीमुळे सचिनचे शतक पूर्ण झाले अन् टीम इंडियाचे तिकीट मिळाले

क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याने एका कार्यक्रमात बोलताना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक प्रेरणादायी आठवण सांगितली. इराणी करंडक १९८९-९० मधील दिल्लीविरुद्धच्या सामन्यात माजी क्रिकेटपटू गुरशरण सिंग यांनी दाखवलेल्या जिद्दीची गोष्ट सचिनने सांगितली.

त्या निर्णायक सामन्यात शेष भारताचा संघ ५५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करत होता. २०९ धावांवर ९ विकेट्स पडल्यावर सचिन जवळपास शतकाच्या उंबरठ्यावर होता. पण त्याचा साथीदार गुरशरण सिंग यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. वैद्यकीय कारणांमुळे फलंदाजी न करण्याचा सल्ला असतानाही, निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांच्या विनंतीवरून गुरशरण यांनी संघाला साथ देण्यासाठी मैदानात उतरायचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

११व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या गुरशरण यांनी वेदना सहन करत सचिनला साथ दिली. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी ३६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि सचिनने नाबाद १०३ धावा ठोकत शतक पूर्ण केले. त्यानंतर गुरशरण ‘रिटायर्ड आऊट’ झाले आणि शेष भारताचा डाव २४५ धावांवर संपला. सामना दिल्लीने ३०९ धावांनी जिंकला, पण या प्रसंगाने सचिनच्या क्रिकेटप्रवासाला नवे वळण दिले.

‘एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स’च्या कार्यक्रमात बोलताना सचिन म्हणाला की, वचने फक्त देण्यासाठी नसतात, ती पूर्ण करायला देखील लागतात. १९८९ च्या त्या सामन्यात गुरशरणने दिलेली साथ मी आजही विसरू शकत नाही. त्यांच्या मदतीमुळेच माझे शतक पूर्ण झाले आणि पुढे माझी टीम इंडियात निवड झाली.