पुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन यांच्या भेटीएवढाच आनंद झाला – सचिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुलंचे साहित्य हे अजरामर असून त्यांनी कलेच्या ज्या ज्या क्षेत्रात संचार केला तेथे पुल छाप सोडली. साहित्य, कला, चित्रपट आदी कला क्षेत्रांतील पुलंचा वावर आपल्या पिढीतील काही लोकांना अनुभकता आलाही असेल; पंरतु अलीकडील पिढीस पुल जाणून घेण्यासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुलंच्या बहुगुणांचा आस्वाद घ्यावा. त्यामुळे नुसते एक वर्ष नको, तर कायम पुलोत्सव साजरा व्हावा. पुलंच्या घरी येऊन मला डॉन ब्रॅडमन यांच्या भेटीचा आनंद झाला, असे उद्गार ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने काढले.

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पुलंच्या भांडारकर रोडकरील ‘मालती माधव’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान, सचिन तेंडुलकरच्या हस्ते आय लव्ह पुल (मी पुलप्रेमी) या कार्यक्रमाच्या लोगोचे आणि पुलोत्सव पुणेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. पुलोत्सवाचे यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा या ग्लोबल पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य विश्वाशी सचिन तेंडुलकर याचे स्नेहपूर्ण नाते आहे. त्यानिमित्त त्याने पुलंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, पुलंच्या स्नुषा ज्योती ठाकूर, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, विरेंद्र चित्राक, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रूपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रूपचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.