
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे वापरत असलेली सहावी महागडी गाडी आऊट लॅण्डर कार आज एनआयएने नवी मुंबईच्या कामोठे परिसरातून हस्तगत केली. त्यामुळे वाझेकडून एटीएस व एनआयएने ताब्यात घेतलेल्या गाडय़ांची संख्या सहावर पोहोचली आहे.
मनसुख हत्या आणि अंबानींच्या घरासमोरील स्फोटके प्रकरणात सचिन वाझे याला अटक केल्यानंतर स्कॉर्पिओ, प्राडो, दोन मर्सिडीज, वोल्क्हो अशा पाच महागडय़ा कार जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आज वाझे याच्या नावावर असलेली आऊट लॅण्डर कार ताब्यात घेण्यात आली असून ती सेकंड ओनर कार असल्याचे उघड झाले आहे. आणखी दोन गाडय़ांच्या शोधात तपास यंत्रणा असल्याने वाझे किती गाडय़ा वापरत होता, असा प्रश्न एटीएस आणि एनआयएला पडला आहे.
दीड महिन्यापासून कार सोसायटीबाहेर उभी
नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर-7मधील शीतलधारा हाऊसिंग सोसायटीच्या बी विंगमधील 703 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये या कारचा मालक राहतो, अशी माहिती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने दिली. ही गाडी काही दिवस सोसायटीच्या पार्किंगमध्ये होती. मात्र गेल्या दीड महिन्यापासून सोसायटीच्या बाहेर लावण्यात आली आहे. त्या फ्लॅटमध्ये एक पोलीस अधिकारी राहत असल्याचे सुरक्षा रक्षकाने तपास यंत्रणांना सांगितल्याने सहाव्या गाडीसोबत वाझे याच्या नवीन घराचा ठाकठिकाणा सापडला काय, असा सवाल निर्माण होत आहे. या सोसायटीतील फ्लॅट कोणाचा आहे, तो कोणाच्या नावावर आहे, याची उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात एनआयएची टीम आहे.
चौथा आरोपी बुकी किशोर ठक्कर ताब्यात
एटीएसने आता चौथ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. किशोर ठक्कर असे त्याचे नाव असून तो सट्टा बाजारात बुकी म्हणून काम करतो. त्याच्याकडून 15 सिमकार्ड हस्तगत करण्यात आली आहेत. दरम्यान एटीएसने आठ दिकसांपूर्वी दमणकरून आणलेली वोल्क्हो कार आणि संशयित किशोर ठक्कर याला एनआयएच्या ताब्यात दिले.
- एनआयएने आज बुकी नागेश गौर आणि विनायक शिंदेला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
































































