
पावसामुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी मौजे. लोहगाव, पाचपिंपळी, ता. बिलोली या गावाला भेट दिली. तसेच नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे आढावा बैठक घेतली. कुंडलवाडी गावातील शेतकऱ्यांनी बाधित पिकांचा पंचनाम्याबाबत अनेक तक्रारी मांडल्या.
शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसमोर संबधित पंचनामा करणारे तलाटी चमकुरे या अधिकाऱ्याला बोलावले. मात्र, ते बैठकीला हजर नसल्याचे समजले. त्या अधिकाऱ्याच्या पंचनाम्याबाबत शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. परिस्थितीचे गांभीर्य पाहता सदाभाऊ खोत यांनी प्रांत अधिकाऱ्यांना तात्काळ त्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याचे आदेश दिले. तसेच एका तासाच्या आत निलंबनाच्या आदेशाची प्रत आपल्याला आली पाहिजे, असे ठणकावले. आपली बाजू समजून घेतल्याने समाधान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या निर्णय घेतल्याबाबत शेतकऱ्यांनी सदाभाऊंचे आभार मानले.




























































