सदानंद कदम यांच्या जामिनावर सोमवारी फैसला, हायकोर्टातील सुनावणी पूर्ण

दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात अटकेत असलेले व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे. शुक्रवारी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. प्रेडिकेट गुन्हा नसतानाही ईडीने अटक केल्याचा दावा सदानंद कदम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

दापोली येथील साई रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम यांना ईडीने मार्चमध्ये अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये जामीन नामंजूर केल्यानंतर त्यांनी अॅड. प्रेरणा गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी कदम यांच्या जामीन अर्जावर जलदगतीने सुनावणी घेतली. यावेळी ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि अॅड. सुदीप पासबोला यांनी ईडीच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. त्याची दखल घेत न्यायालयाने ईडीला आपली बाजू मांडण्यात दिरंगाई न करण्याची ताकीद दिली होती. त्यानुसार ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देव्यांग व्यास यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाले. न्यायमूर्ती कर्णिक हे कदम यांच्या जामिनाचा निर्णय सोमवारी जाहीर करणार आहेत.