
पालघर जिल्ह्यात झालेल्या साधूंच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेल्या 14 जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर याचवेळी इतर 18 जणांचा जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी नामंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या न्यायालयात झाली.
पालघरमधील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर समजून जमावाने 16 एप्रिल 2020 रोजी कल्पवृक्ष गिरी (70) आणि सुशीलगिरी महाराज (35) तसेच त्यांचा वाहन चालक नीलेश टेलगडे यांना बेदम मारहाण करीत हत्या केली होती. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कासा पोलिसांनी 201 जणांना अटक केली. त्यामध्ये 75 जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. अटकेतील काही जणांना ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर आधीच जामीन मंजूर केला होता. मंगळवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली त्यावेळी 14 जणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच याचवेळी आलेल्या 18 जणांचा जामीन अर्ज नामंजूर केला. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 30 जुलै रोजी होणार आहे.































































