
सामना ऑनलाईन । इंदूर
नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि यापुढेही राहतील, असे वक्तव्य भोपाळ येथील भाजपच्या लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केला आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला असून भाजपने मात्र साध्वी यांच्या वक्तव्याबाबत हात झटकले असून जाहीर माफी मागण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणावर प्रज्ञासिंह यांनी पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका असा माफीचा सूर आळवला.
भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच दोनच दिवसांपूर्वी अभिनेता आणि मक्कल निधी मैयम पक्षाचा अध्यक्ष कमल हसनने महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशातील पहिला हिंदू दहशतवादी असे संबोधले होते. या वक्तव्याचा साध्वी प्रज्ञासिंह यांनी चांगलाच समाचार घेतला.
नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्तच राहणार आहेत. त्यांना हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांनी आधी आपण स्वतः काय आहोत हे पाहायला हवे. अशा व्यक्तींना जनता निवडणुकीत धडा शिकवेल. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.
प्रज्ञासिंह यांनी माफी मागावी – भाजप
भाजप साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. पक्ष त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागेल आणि त्यांनी याबाबत जाहीरपणे माफी मागावी, असे भाजप प्रवक्ते जीवीएल नरसिंह राव यांनी म्हटले आहे.
गोडसेचे गुणगान हा देशद्रोह
साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. नथुरामचे गोडवे ही देशभक्ती नाही, तो एक खुनी होता त्याचे गोडवे गाणे हा देशद्रोह आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.























































