11 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढले ; उरण नगर परिषदेच्या मुजोर कंत्राटदाराविरोधात बेमुदत उपोषण

कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून उरण शहराचा कोपरान् कोपरा स्वच्छ ठेवणाऱ्या 43 पैकी 11 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून कंत्राटदाराने रोजीरोटीवर वरवंटा फिरवल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी आजपासून नगर परिषदेच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कमी केलेल्या कामगारांमध्ये दलित, आदिवासींचा समावेश आहे.

उरण नगर परिषदेने शहरातील स्वच्छतेचे काम एका ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. यामध्ये 43 स्त्री-पुरुष कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. मात्र अचानक या ठेकेदारने 43 सफाई कामगारांना तडकाफडकी घरी पाठवले होते. ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या कामगारांनी उरण नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी समीर जाधव, ठेकेदार आणि म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 43 कामगारांना पुन्हा कामावर घेतले होते. यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते, परंतु त्यानंतर ठेकेदाराने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 43 पैकी 11 दलित, आदिवासी, गरीब सफाई कामगारांना अतिरिक्त ठरवत कामावर कमी करण्यात केले आहे. या विरोधात कामगारांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

हे कामगार मागील 15 वर्षांपासून काम करीत आहेत.
कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता शहर सफाईची कामे केली आहेत. नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त ठरवत कमी करण्यात आलेल्या या कामगारांचा प्रश्न निकाली निघेल.
– संतोष पवार, कार्याध्यक्ष, म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन

निधीअभावी नवीन टेंडर काढण्यात आलेले नाही.
मात्र कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी ठेकेदाराशी चर्चा करून, समन्वय साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
समीर जाधव, मुख्याधिकारी