मुंबईच्या चौपाट्यांवर सुरक्षा टाइट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र भगत । मुंबई

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने चौपाटय़ांवरील सुरक्षा टाइट केली आहे. यासाठी अग्निशमन दलात लवकरच ५७ नवीन लाइफ गार्डची भरती करून त्यांना सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात येणार आहे. शिवाय अग्निशमन दलातील फायरमननाही बुडणाऱया पर्यटकांना वाचवण्याचे खास टेनिंग देण्यात आले आहे. यामुळे मुंबईच्या चौपाटय़ांवरील सुरक्षा वाढणार आहे.

मुंबईत गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा सहा चौपाटय़ा आहेत. पावसाळय़ात या चौपाटय़ांवर येणाऱया पर्यटकांची संख्या वाढते, मात्र अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर सुरक्षा योजना सक्षम करण्यात येत आहेत. सध्या अग्निशमन दलाकडे ३६ लाइफ गार्ड आहेत. सहा चौपाटय़ांवर दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन ते तीन लाइफ गार्ड तैनात असतात. मात्र या दिवसेंदिवस चौपाटय़ांवर वाढणारी पर्यटकांची गर्दी पाहता उपलब्ध लाइफ गार्डची संख्या कमी पडते. त्यामुळे नव्या भरतीमुळे ही समस्या सुटणार आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. तीन वर्षांच्या या कामासाठी दहा कोटींचा खर्च येणार आहे.

पावसाळय़ात समुद्राला ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीची येणारी भरती, गणेशोत्सवासह अनेक सण-उत्सव, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाढणाऱया गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे लाइफ गार्डची संख्या वाढवण्यात येणार आहे.
सहा नव्या बोटी
लाइफ गार्डसह सहा चौपाटय़ांवर सहा नव्या अद्ययावत बोटी घेतल्या जाणार आहेत. याशिवाय रेस्क्यू टीम, रिंग बॉइज, रोप्स, फ्लोटिंग डिव्हाइस, स्पाइन बोर्ड, गाडय़ा, लाइफ जॅकेट अशी साधने सज्ज ठेवण्यात येणार आहेत. नव्याने ५७ लाइफ गार्डची भरती केल्यामुळे आता अग्निशमन दलाकडे ९३ लाइफ गार्ड उपलब्ध होणार आहेत.
पावसाळय़ात चौपाटय़ांवर होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले आहे. लवकरच नव्या लाइफ गार्डची भरती करण्यात येणार असून रेग्युलर फायरमननाही लाइफ गार्डचे ट्रेनिंग दिले आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत.

डॉ. प्रभात रहांगदळे,
प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई