
गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून आज पहाटे झालेल्या दमदार पावसामुळे संगमेश्वर नायरी मार्गावरील फणसवणे जाखमाता मंदिराजवळची मोरी खचून भगदाड पडला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याने चार चाकी वाहने जाणे अशक्य बनले आहे. यामुळे संगमेश्वर नायरी मार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे.
संगमेश्वर नायरी मार्ग हा गेली अनेक वर्षे चर्चेचा विषय बनून राहिला आहे. या मार्गावरील खड्डे , साईडपट्टीची दयनीय अवस्था, अरुंद मोऱ्या, कमी उंचीचा अलकनंदा नदीवरील पूल यामुळे यामार्गावरुन प्रवास करणे कंटाळवाणे आणि धोक्याचे ठरते. याबाबत अनेकवेळा निवेदने देऊन, आवाज उठवून ग्रामस्थांच्या पदरी निराशा आल्याने पाच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत फणसवणे जाखमाता मंदिरात याबाबत बैठक घेऊन बांधकाम विभागाचे रस्त्याच्या कामाबाबत लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना केली होती.
संघर्ष समितीच्या निवेदनाला बांधकाम विभागाने चक्क केराची टोपली दाखवल्याने अखेर शास्त्रीपूल येथे समितीने बेमुदत उपोषण सुरु केले. यावेळी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे अधिकारीही उपोषण स्थळी आले आणि लेखी आश्वासन देवून संघर्ष समितीची बनवाबनवी करुन गेले. लेखी आश्वासन देऊन ना खड्डे भरले गेले ना साईडपट्ट्या भरल्या गेल्या. आजच्या स्थितीला कसब्यात प्रवेश करतांना शास्त्रीपूलापासूनच खड्ड्यांना सुरुवात होते. गटारे नसल्याने सारे पाणी रस्त्यावर असते, त्यामुळे आपण रस्त्यावरुन जातोय की छोट्या वहाळातून हेच समजत नाही.
कसबा हे ऐतिहासिक ठिकाण येथे असंख्य पर्यटक दरवर्षी येत असतात. पर्यटन वाढण्यासाठी पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देतांना जर रस्त्याची अशी भयावह अवस्था असेल तर पर्यटक येणार कसे ? याचा विचार व्हायला हवा. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी फणसवणे जाखमाता मंदिरात संघर्ष समितीची स्थापना झाली.
या मंदिराच्या जवळच रस्त्यावर मोरीला मोठे भगदाड पडल्याने आता संघर्ष समिती कोणता निर्णय घेते याकडे वाहनचालकांचे लक्ष वेधले गेले आहे. हे भगदाड पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी मोठे होत जाणार आहे. जोपर्यंत कसबा नायरी या गावांकडे जाणारा रस्ता उत्तम दर्जाचा होत नाही, तोपर्यंत पर्यटकांनी येथील ऐतिहासिक स्थळांकडे पाठ फिरवली तर नवल वाटायला नको.

























































