सिंधुदुर्ग किनारपट्टी मंगळवारपासून ‘सील’; ‘सागर सुरक्षा कवच’ला होणार सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
देवबाग किनारपट्टीवर लाटांच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेली संरक्षक भिंत

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 22 ते 23 जानेवारीला पोलीस प्रशासनाच्या वतीने सागर सुरक्षा कवच मोहीम राबविण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मंगळवारी 22 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून 23 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत 36 तास ही मोहीम चालणार आहे. पोलीस प्रशासनाचे रेड व ब्ल्यू पथक या मोहिमेत सहभागी होणार असून रेड टीमचे कवच भेदण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाचीच ब्ल्यू टीम सज्ज झाली आहे.

मालवण व आचरा किनारपट्टीवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सहा अधिकाऱ्यांसह 50 पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. मालवण किनारपट्टीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तोंडवळी, आचरा किनारपट्टीवर टेहाळणी मनोरे, समुद्रात दोन स्पीडबोट अशी सुरक्षा कवच मोहीम राबविली जाणार आहे. प्रमुख रस्ते मार्गांवरही नाकाबंदी केली जाणार असून वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.

किनारपट्टीवरील मालवण, देवगड व वेंगुर्ले या किनारपट्टी तालुक्यात प्रामुख्याने ही मोहीम राबविली जाते. यात किनारपट्टीवरील सर्व पोलीसांची स्थानके सहभागी होणार आहेत. पोलिसांच्याच रेड टीममधून दहशतवादी वेशात चोरीछुपे पोलीस किनारपट्टीवरील ब्ल्यू टीमचे सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न करणार असून यातून सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. याचा अहवालही वरिष्ठांना द्यावा लागतो. त्यामुळे या मोहिमेला महत्व असते.