सागरेश्वराचं सौंदर्य

>> अनंत सोनवणे

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचं प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो. म. मोहिते या निसर्गप्रेमीच्या ध्यासातून आणि लोकसहभागातून हे अभयारण्य आकाराला आलंय…

नावात काय आहे? असं शेक्सपिअरनं विचारलं होतं. वन्यजीव अभयारण्यांचा विषय आला की मनात येतं- आकारात काय आहे? आपल्या देशात हजारो चौरस किलोमीटरचा विस्तार असलेली जंगलं आहेत, तशीच अवघ्या एका दिवसात पायी भटकंती करता येईल अशी चिमुकली वनंसुद्धा आहेत. महाराष्ट्रातलं असंच एक आकारानं लहान असलेलं अभयारण्य म्हणजे सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. सांगली जिल्हय़ात कृष्णा नदीच्या खोऱ्यात नागरोबा डोंगरावर वसलेल्या या अभयारण्याचं क्षेत्रफळ आहे अवघं १०.८७ चौरस किलोमीटर! आकारानं लहान असलं तरी वन्यजीव आणि जैवविविधतेच्या बाबतीत विस्तीर्ण अभयारण्यांच्या तुलनेत ते कुठंही कमी पडत नाही!

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचं प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. वन विभागाने परिश्रम व नियोजनपूर्वक लागवड करून वाढवलेलं हे जंगल आहे. धो. म. मोहिते या निसर्गप्रेमीच्या ध्यासातून आणि लोकसहभागातून हे अभयारण्य आकाराला आलंय. वन विभागाने अभयारण्याच्या भोवती तारेचं कुंपण लावलं आहे. त्यामुळे इथल्या गवताचं, झाडा-झुडुपांचं पाळीव गुरांपासून संरक्षण होतं. इथं ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यजीवांसाठी बारमाही पाण्याची सोय झाली आहे. पर्यटकांसाठी निसर्ग माहिती केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

सागरेश्वरचं जंगल शुष्क पाणगळी प्रकारचं आहे. तसेच इथे काटेरी झुडुपी जंगलसुद्धा आहे. अभयारण्याचा बराचसा भाग डोंगराळ आहे. काही ठिकाणी गवताळ उतारही आहे. इथे प्रामुख्याने लागवड केलेले घावडा, गुलमोहर, बहावा, कडुनिंब, सैर, सिरस, चिंच, अर्जुन, सुबाभूळ, निलगिरी, पांगारा, सिसम, कशिद, चंदन, आपटा, सिताफळ पाहायला मिळतात. दश धामरी, घाणेरी, चिलरची झुडुपं आणि करवंद, बोराच्या जाळी आहेत. तसेच साग, वड, पिंपळ, लिंब, औदुंबरसारख्या वनौषधीही आहेत.

या छोटेखानी जंगलात तब्बल १४२ जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यात पिंगळा, शृंगी घुबड, नीलपंख, टकाचोर, काळा कोतवाल, करडा कोतवाल, रानभाई, पोपट, शंखी धनेश, लालमुखी टिटवी, चंडोल, तित्तर, लावा, करकोचे, बगळे, मोर, कवडे, पठाणी होला, पांढरपोट वटवटय़ा, राखी वटवटय़ा, मुनिश, तुतवार, तुतारी, रानबदक, सर्पमार गरुड, शिता, वेडा राघू, रानवा, गव्हाणी घुबड, हळद्या आदी पक्ष्यांचा समावेश होतो. हिंदुस्थानात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्युएल या जंगलात पहायला मिळाले.

इथे वन्यप्राणी व सरपटणाऱया जीवांचं बरंच वैविध्य आढळतं. इथं काळवीट, काकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, बोकड, कोल्हा, तरस, साळिंदर, वटवाघूळ, लांडगा, खार, ससा, हनुमान लंगूर आदी वन्यजीव आढळतात. विविध प्रकारचे साप, बेडूक, पालीही इथे पहायला मिळतात. खानापूर, वाळवा आणि पलूस या तीन तालुक्यांच्या सीमाभागात पसरलेल्या या जंगलात पावसाळय़ात वातावरण अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे असते.

मुसळधार पाऊस, दरीत उतरलेले धुके, झोंबणारा गार वारा, फेसाळते धबधबे, प्रसन्न हिरवाई आणि पक्ष्यांचा कुंजारव! निसर्गप्रेमी मनाला आणखी काय हवं? सरकारने इच्छाशक्ती दाखवली आणि नागरिकांनी साथ दिली तर किती सुंदर काम उभं राहतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सागरेश्वर. शासन आणि लोकांच्या सहकार्यातून आणखी अभयारण्ये उभी रहायला हवीत.

सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण           : मानवनिर्मित अभयारण्य
जिल्हा                     :  सांगली
राज्य                      : महाराष्ट्र
क्षेत्रफळ                   : १०.८७ चौ. कि.मी.
निर्मिती                    : १९८५
जवळचे रेल्वे स्थानक     : सांगली (३० कि.मी.)
जवळचे विमानतळ       : मुंबई (३८० कि.मी.)
निवास व्यवस्था           : सांगलीत खासगी हॉटेल्स
सर्वाधिक योग्य हंगाम     : ऑक्टोबर ते एप्रिल, जून ते ऑगस्ट
सुट्टीचा काळ              : नाही
साप्ताहिक सुट्टीचा दिवस : नाही

-sonawane.anant@gmail.com