
श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. कान्हुराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. बानायत यांनी तत्काळ हजर राहून पदभार स्वीकारावा, अशी सूचनादेखील देण्यात आली आहे. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
भाग्यश्री बानायत या 2012च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या नागपूर येथे रेशीम उद्योग संचालनालयात संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची नागालँड केडरमध्ये निवड झाली होती. मात्र 2018 मध्ये त्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आल्या आहेत.
शिर्डी संस्थानचे सीईओ बगाटे यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. साईबाबा संस्थानवर थेट सनदी अधिकाऱयाची नियुक्ती असावी, असे आदेश असताना बगाटे थेट आयएएस नसल्याने त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी झाल्या होत्या. सध्या न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच त्यांची बदली झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून संस्थानचा कारभार तदर्थ समितीमार्फत केला जात आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरते.

























































