साईबाबांच्या धुनीतील उदी भाविकांना मिळणार घरपोच, व्हॉट्सऍपवर नाव आणि पत्ता पाठवावा लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील करोडो भाविकांची श्रद्धा असलेल्या साईंच्या धुनीतील उदी भाविकांना घरपोहोच देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. यासाठी भाविकांनी संस्थानच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर आपले नाव आणि पत्ता पाठवायचा आहे.

शिर्डी साईबाबांची महिमा अपरंपार आहे. त्यामुळे साईबाबांचे भक्त देश-विदेशात आहेत. वर्षभरात करोडो भाविक शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतात. मात्र, कोरोना महामारीमुळे वर्षभरात दोन वेळा साईंचे मंदिर बंद झाले आहे. सध्या दुसऱया लाटेतदेखील समाधी मंदिर बंद असल्याने तसेच राज्यात कोविड नियमांची सक्ती असल्यामुळे भाविकांना शिर्डीला येता येत नाही.

भाविकांची गरज आणि मागणी लक्षात घेता साईबाबा संस्थानने घरपोहोच मोफत उदी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक व्हॉट्सऍप क्रमांकदेखील जारी करण्यात आला. भाविकांसाठी केलेल्या उपाययोजनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संस्थानच्या व्हॉट्सऍपवर साईबाबांऐवजी अधिकाऱयांचे फोटो

संस्थानद्वारे दिलेल्या क्रमांकावर चक्क साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे आणि जनसंपर्क विभागातील कर्मचारी राजाराम थेटे यांचा फोटो असल्याने साईभक्त आणि स्थानिकांमध्ये नाराजी दिसून आली. शिर्डीतील ग्रामस्थ सुरेश आरणे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल माध्यमांमध्ये पोस्ट केली. काही वेळात ते फोटो आणि पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. अखेर सोशल माध्यमांवर अधिकारी ट्रोल होऊ लागल्याने त्यांनी अखेर स्वतःचे फोटो काढून साईसमाधीचा फोटा लावला.