सैनिक हो तुमच्यासाठीचा ५८ वा प्रयोग २६ नोव्हेंबरला कुसूम सभागृहात सादर होणार, राज्यभरातील कलावंतांची हजेरी

'Sainik Ho Tumchyasathi' (58th Show) Tribute to 2611 Martyrs on Nov 26 in Nanded

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली तसेच देशभक्तीपर भावना जागृत करण्यासाठी दि.२६ नोव्हेबर २०२५ रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे सायंकाळी सहा वाजता पत्रकार विजय जोशी प्रस्तूत सैनिक हो तुमच्यासाठी….चा ५८ वा प्रयोग सादर होणार आहे. यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलावंत सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दल आणि संवाद संस्थेची हि निर्मिती आहे.

इ.स.२००८ पासून हा कार्यक्रम सातत्याने होत असून, आतापर्यत नांदेडसह पुणे तसेच तेलंगणा व कर्नाटकात देखील याचे प्रयोग झाले आहेत. एकूण ५७ प्रयोगात जवळपास राज्यातील बाराशेहून अधिक दिग्गज कलावंत व वादकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यकमाचे सातत्य आणि देशभक्तीची भावना या माध्यमातून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

कुसूम सभागृहात होणार्‍या या ५८ व्या प्रयोगाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते होणार असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे आदीची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे दिग्दर्शन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे आणि बापू दासरी यांचे असून, प्रख्यात निवेदिका डॉ.सौ.वैशाली गोस्वामी या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत. संभाजीनगरच्या प्रख्यात गायिका सरला शिंदे, गौरव पवार, राहुल वाव्हुळे तर नांदेडचे प्रख्यात कलावंत श्रीरंग चिंतेवार व पौर्णिमा कांबळे हे देशभक्तीपर रचना सादर करणार आहेत. आरती किऐशन्स छत्रपती संभाजीनगरचे नृत्य कलावंत यावेळी देशभक्तीपर रचनांच्या माध्यमातून विविध नृत्य देखील सादर करून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. या नृत्याचे दिग्दर्शक उमेश चाबुकस्वार छत्रपती संभाजीनगर यांचे आहे. संगीतसाथ छत्रपती संभाजीनगरचे राजू जगधने, राजेश भावसार, अभिजित शिंदे, गणेश चव्हाण आदी करणार असून, विशेष आकर्षण म्हणून नवोदित व्हायोलिन वादक डॉ.गुंजन शिरभाते या या कार्यकमात आपली विशेष झलक सादर करणार आहेत. पत्रकार विजय जोशी व संवाद संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर होणार असून, नांदेड जिल्हा पोलीस दल यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले आहे.

कुसूम सभागृहात दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून, रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.