हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी साईराज बहुतुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या लेग स्पिनने भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱया साईराज बहुतुले यांची हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी साईराज यांची मुलाखत हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) काही अधिकाऱयांनी घेतली होती. त्यावेळीच साईराज हे गोलंदाजी प्रशिक्षक होतील, असे म्हटले जात होते. मंगळवारी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

साईराज यांनी हिंदुस्थानचे दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे आणि जवळपास दोन दशकांची दमदार प्रथम श्रेणी कारकीर्द गाजवली. त्यांना खेळाडू म्हणून देशांतर्गत क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर फ्रँचायझी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीतील प्रतिभा जोपासण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6176 धावा केल्या आणि 630 विकेट घेतले आहेत.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर साईराज हे प्रशिक्षणाकडे वळले आणि काही संघांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. विदर्भ, केरळ, गुजरात आणि बंगाल संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ससोबत फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. 2022 मध्ये हिंदुस्थानने जो 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला होता त्या संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी इंडिया ‘अ’ आणि वरिष्ठ पुरुष संघासोबत विशेषज्ञ गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काही स्पर्धांमध्ये मोठय़ा प्रमाणावर काम केले आहे. 2021 ते 2024 या काळात ते बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षण टीमचे एक प्रमुख सदस्य होते.

‘भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. खेळाडू म्हणून हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती आणि प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये योगदान देण्याची संधी मिळणे हे खूप विशेष आहे. मी खेळाडूंसोबत काम करण्यास  उत्सुक आहे.’

साईराज बहुतुले,  हिंदुस्थानचे सहाय्यक प्रशिक्षक