सकल धनगर समाजाच्या मिरी येथील उपोषणकर्तांवर जिल्हा रुग्णालयात उपचार

धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमल बजावणी करा. या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील विरभद्र मंदिरात राजूमामा तागड व बाळासाहेब कोळसे यांनी गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. दरम्यान उपोषणकर्ते राजूमामा तागड यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या उपचाराबाबत माजी नगरसेविका कलावती शेळके, धनगर समाज वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख काका शेळके यांनी भेट देऊन विचारपुस केली.

चोंडी जिल्हा नगर या उपोषणाला 19 दिवस पूर्ण होत आहेत सोबत आंदोलनाची साखळी निर्माण होत आहे. सदर घटनेला पाठिंबा देण्यासाठी मिरी, तालुका पाथर्डी या ठिकाणी राजू मामा तागड मित्र मंडळ उपोषणाला बसले होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा तसेच विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. धनगर समाज काही राज्यांमध्ये एसटीमध्ये आहे तर काही राज्यांमध्ये नाही अशी पद्धत का सर्वांना समान का नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने मोर्चेकरावे लागले आहेत. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहीर भूमिका घेतात परंतु फक्त निवडणुका तोंडावर आल्यावर मात्र सत्तेत आल्यावर काहीच कृती करताना दिसून येत नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय विखे चौंडी व मिरी येथील उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास आले नसल्याने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या बैठका सुरु आहेत. लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची दिशा नगर जिल्ह्यातून ठरविण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे काका शेळके यांनी म्हणाले.