
तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुलाचा मोबाईल घेऊन तो परत मिळविण्यासाठी मुलाच्या वडिलांकडे उपनिरीक्षकाने 10 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती साडेतीन हजार रुपये घेऊन अधिकाऱ्याने पळ काढल्याचा प्रकार साकीनाका पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी अँण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
विनायक (नाव बदललेले) यांच्या घराजवळ झालेल्या भांडणावेळी त्यांच्या लहान मुलाच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे मुलाला घेऊन ते तक्रार देण्यासाठी साकीनाका पोलीस ठाण्यात गेले, मात्र उपनिरीक्षक प्रवीणकुमार पवार यांनी बापलेकाची तक्रार घेण्याऐवजी त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. इतकेच नाही तर विनायक यांच्या मुलाचा ताब्यात घेतलेला मोबाईल परत करण्यासाठी पवार यांनी 10 हजारांची लाच मागितली. लाच द्यायची नसल्याने विनायक यांनी अँण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. दरम्यान, तडजोडीअंती साडेतीन हजार द्यायचे ठरले. त्यानुसार पवार यांनी साडेतीन हजार विनायक यांच्याकडून घेतले, पण ती रोकड घेऊन पवार यांनी तेथून लगेच पळ काढला. त्यामुळे त्यांना रंगेहाथ पकडता आले नाही. मात्र ऍण्टी करप्शन ब्युरोने प्रवीणकुमार पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

























































