
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानावर नेहमीच शांत दिसतो. धावांचा पाठलाग करायचा असो किंवा मोठी धावसंख्या उभारायची असो किंवा फलंदाज-गोलंदाज यांनी खराब कामगिरी केलेली असो नेहमीच धोनी डोक्यावर बर्फ ठेवून निर्णय घेताना दिसतो. यामुळे त्याला ‘कॅप्टन कुल’ ही उपाधीही मिळाली. मात्र आता त्याच्या पत्नीने एक गौप्यस्फोट केला आहे.
‘कॅप्टन कुल’ धोनीला देखील राग येतो आणि तो दुसऱ्याचा राग माझ्यावर काढतो, असे साक्षी धोनी म्हणाली. चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) सोशल मीडिया पेजवर साक्षी धोनीने हा खुलासा केला आहे. याबाबत ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर साक्षी धोनी हिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात साक्षी काही खुलासे करताना दिसते. मी एकमेव व्यक्ती आहे जी धोनीला त्रास देऊ शकते, असे साक्षी सांगते. तसेच तो दुसऱ्याचा राग माझ्यावर काढतो, मात्र मला त्याचे काही वाटत नाही असे ती म्हणते.
ती त्याच्याशिवाय कोणाचे ऐकत नाही
मुलगी झिवाबाबतही साक्षीने काही गोष्टी सांगितल्या. झिवा वडिलांशिवाय कोणाचेही ऐकत नाही. मी तिला जेवणासाठी 10 वेळ बोलावले तरी ती ऐकत नाही, मात्र माही एकदा बोलला की लगेच जेवण करते, असेही साक्षीने सांगितले.




























































