
>>प्रांजल वाघ
सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे. याच कण्याचा आधार घेऊन थोरल्या छत्रपती शिवरायांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं, वाढवलं आणि महाराष्ट्राच्या पुढच्या पिढय़ांनी ते थेट अटकेपार नेलं. याच सह्याद्रीच्या आणि महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला आहे महाराष्ट्राचे सर्वोच्च दुर्ग साल्हेर आणि सालोटा!
नाशिक जिह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगररांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच. साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मांगी तुंगी, रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्सची इथे पार चैन असते. अवघड आणि सरस असे किल्ले. साल्हेर सालोटा किल्ल्यांची ही भटकंती दुर्गवैभवाची प्रचीती देणारी ठरली.
विष्णू अवतार असलेल्या भगवान परशुरामांशी सांगड घालणारा, सातवाहन-चालुक्य कुळाच्या इतिहासातील पाऊलखुणा टिकवून असलेला, बागुलवंशीयांचे पराम सांगणारा, स्वराज्याच्या इतिहासातील पहिल्या मैदानी युद्धाची साक्ष देणारा आणि वीर सूर्याजी काकडेंचे हौतात्म्य भिजल्या नेत्रांनी पाहणारा हाच तो दुर्ग. वाघम्बे आणि साल्हेरवाडी या दोन्ही बाजूंनी कातळकोरीव पायऱ्यांनी आणि भक्कम द्वारांची शृंखला असलेले चढाई मार्ग हे या गडाचे वैशिष्टय़.
साल्हेर आणि सालोटा हे सेलबारी-डोलबारी पर्वतरांगांचे जुळे किल्ले आहेत जे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेजवळ नाशिक जिह्यातील बागलाण प्रदेशात आहेत. कळसूबाईनंतर साल्हेर शिखर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे, पण साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची 5,175 फूट आहे. साल्हेर आणि सालोटा किल्ले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. एका टेकडीच्या माथ्यावर चढून गेल्यावर दुसऱ्या टेकडीचे विहंगम दृश्य दिसते. दोन्ही किल्ल्यांवर अजूनही ऐतिहासिक अवशेष दिसतात. साल्हेर किल्ल्याच्या माथ्यावर असलेला तलाव आणि त्याच्या सर्वोच्च बिंदूवरील मंदिर आपल्याला किल्ल्याच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. सालोटा किल्ल्याच्या माथ्यावर भगवान हनुमानाची मूर्तीदेखील आहे. साल्हेरचा जोडकिल्ला असलेला सालोटा छोटा आहे, पण तितकाच आकर्षक. इथला कातळकोरीव पायरीमार्ग आणि दरवाजे पण स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहेत. हे दोन्ही गिरिदुर्ग बांधकामाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. किल्ल्यावर मुक्काम करून इथला सूर्योदय व सूर्यास्त एकदा तरी अनुभवलाच पाहिजे.
भगवान परशुरामांनी याच पर्वताच्या शिखरावर उभं राहून बाणांचा वर्षाव करून अपरांत भूमी म्हणजेच कोकणची निर्मिती केली असं म्हणतात. याच दुर्गाचा आधार घेऊन सरनोबत प्रतापराव गुजर आणि पंतप्रधान मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुघलांचा मैदानावर समोरासमोर सामना करून दिलेरखानाच्या 40,000 फौजेचा धुव्वा उडवला. दुर्दैवाने शिवरायांचे बालपणीचे मित्र आणि पंचहजारी मनसबदार सूर्याजी काकडे यांना इथे वीर मरण आले.




























































