जेव्हा डान्ससाठी सलमानला मिळाले फक्त ७५ रुपये…

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा सध्या कमाईच्या बाबतीत देखील हिंदुस्थानातील अभिनेत्यांमध्ये दबंग ठरलेला आहे. चित्रपटासाठी मिळणारे मानधन तर कोट्यवधींमध्ये घेतोच पण त्यासोबत चित्रपटाच्या कमाईचा काही भागही सलमान घेतो. सलमानच्या कमाईची कोटींच्या कोटी उड्डाणे समोर येत असतानाच आता चक्क डान्स केला म्हणून सलमानला मानधन म्हणून अवघे ७५ रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे.

त्याचे झाले असे की, बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या आधी ताज हॉटेलमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात सलमान साईड डान्सर म्हणून होता. मुख्य कलाकाराच्या मागे नाचण्यासाठी त्यावेळी त्याला ७५ रुपये मानधन देण्यात आले होते. तो सलमानचा पहिला पगार होता. सलमानने नुकताच एका कार्यक्रमात त्याच्या पहिल्या पगाराचा खुलासा केला. ‘माझा एक मित्र साईड डान्सर म्हणून काम करायचा, एकदा तो मला देखील घेऊन गेला. मला माहीत नव्हतं की तिथे डान्स केल्यावर मला पैसे मिळतील, पण जेव्हा कार्यक्रम आटोपला तेव्हा आयोजकांनी आमच्या प्रत्येकाच्या हातात ७५ रुपयांचं पाकीट ठेवलं. तो माझा पहिला पगार होता’, अशी आठवण सलमानने चाहत्यांसोबत शेअर केली.

सलमान हा सध्या बॉलिवूडमधला सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सलमान अग्रस्थानी होता.

आपली प्रतिक्रिया द्या