सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरण; लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आरोपीचा जामीन फेटाळला

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सदस्याला मकोका कोर्टाने दणका दिला आहे. विशेष कोर्टाने आरोपी मोहम्मद रफिक सरदार चौधरी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी वांद्रे पश्चिम येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने उचलली. तपासानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी याने गोळीबाराच्या दोन दिवस आधी गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती, त्या परिसराचा व्हिडीओ शूट केला होता आणि तो या प्रकरणातील वॉण्टेड आरोपी अनमोल बिष्णोईला पाठवला होता. चौधरी, गुप्ता आणि पाल यांच्यासह सोनूकुमार बिष्णोई, मोहम्मद रफिक चौधरी आणि हरपाल सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.