
सामना ऑनलाइन, मुंबई
बहुचर्चित चित्रपट रेस-३ तिकीटबारीवर दणकून आपटल्यानंतर आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा नवीन चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटात तो त्याच्या गाजलेल्या ‘रील’ नावाने भूमिका साकारणार आहे. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांमध्ये सलमानने ‘प्रेम’ या नावाने व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. सलमानच्या आगामी चित्रपटातही तो याच नावाने पुन्हा एकदा एक नवीन भूमिका साकारणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानचा आगामी चित्रपट हा २०११ मध्ये आलेला ‘रेडी’ चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. पण, या चित्रपटाची निर्मिती कोणी करणार किंवा दिग्दर्शक, नायिका कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. २०११ च्या ‘रेडी’ या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली होती, तर दिग्दर्शन अनिस बज्मी यांनी केलं होतं. अभिनेत्री असिन थोट्टुमकल या चित्रपटात सलमानची नायिका म्हणून झळकली होती. अर्थात सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सलमान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनीस बज्मी आहेत. त्यामुळे ही जोडगोळी पुन्हा एकदा सलमानलाच त्यांच्या पुढच्या चित्रपटात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.































































