
महिला पत्रकाराला टिकली लावण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्य महिला आयोगाने शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिंडे यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. पण या नोटीसला उत्तर देण्यासाठी त्यांनी दहा दिवसांची मुदत मागितली आहे.
संभाजी भिडे मध्यंतरी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबद्दल प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर तुझ्या कपाळाला टिकली नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही असे वक्तव्य केले होते.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत त्यांना नोटीस पाठविली होती. या नोटीसला संभाजी भिडे यांनी कोणतेही उत्तर न दिल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दुसरी नोटीस पाठवली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. पण आता त्यांनी नोटीसला उत्तर देण्यासाठी वाढीव अवधी मिळावा, अशी विनंती केली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विटही केले आहे.

























































