
आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंदुस्थानने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर संभाजी भिडेंनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदी चुकीचे बोलले असल्याचेही भिडे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संयुक्त राष्ट्रसंघातील वक्तव्यावर बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करू शकतो. ते काम आपले आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत असे संभाजी भिडे म्हणाले. नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱया सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये संभाजी भिडे सहभागी झाले होते. तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी 1982 साली संभाजी भिडेंनी सांगलीत ‘शिवप्रतिष्ठान’च्या वतीने दुर्गामाता दौड सुरू केली.
























































