
संभाजीनगर महापालिकेच्या मेडिकल स्टोअर रुममधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिकेने कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी सरकारच्या कोट्यातून दहा हजार रेमडेसिवीर खरेदी केले होते. यातील पाच हजार रेमडेसिवीर घाटी व जिल्हा रुग्णालयास देण्यात आले. मनपाने साडेचार हजार इंजेक्शन मेल्टॉन कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वापरले. उर्वरित रेमडेसिवीर इंजेक्शन मनपाच्या स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले. त्याची नोंदही घेतली. परंतु स्टोअर रूममधून 48 रेमडेसिवीर इंजक्शानचा बॉक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी स्टोअरमधील पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 24 तासात खूलासा मिळाला नाहीतर गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.
































































