महापुरात 50 सापांना जीवदान देणारा अवलिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sambhaji tarale save 50 snake

महापुरात अडकलेल्या माणसांना वाचविण्यासाठी माणूस धावला, जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांना देण्यासाठी हजारो हात सरसावले, त्यांना आसरा देण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. इतकेच काय तर पुरात जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या सापांना वाचविण्यासाठी शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील सर्पमित्र संभाजी तारळे धावले. महापुरात व महापुरानंतर गावातील 50 हून अधिक सापांना जीवदान देवून त्यांच्याविषयी तळमळ दाखविली आहे.

सापाचे नाव जरी घेतले, तरी जीवाचा थरकाप उडतो. त्यातही काहीवेळा सापाने दंश केल्यास केवळ त्याच्या भीतीनेच उपचारापूर्वीच अनेकजण गार होतात अशी परिस्थिती आहे. हेरवाडमधील अवघ्या 23 वर्षाचा असा अवलिया आहे, जो सापांना सुरक्षित पकडतोच, पण पकडलेल्या सापांना उचित ठिकाणी सुरक्षित सोडून देतो. त्याचे नाव आहे संभाजी तारळे. हेरवाडला आलेल्या महापुरात या पठ्याने चक्क 50 हून अधिक विषारी सापांना जीवदान दिले आहे.

संभाजी तारळे यांना सापांची माहिती गोळा करण्याचा तसेच त्यांचा अभ्यास करण्याचा छंद आहे. गेल्या एक वर्षापासून संभाजी तारळे यांनी शेकडो सर्पांना पकडून जीवदान दिले आहे. हेरवाडमध्ये महापुराने अस्मानी संकट ओढवले. गावाच्या अनेक भागांना तळ्याचे स्वरुप आले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी सापांनी हैदोस घातला. काहींच्या घरात, कपाटात, कपड्यात, रस्त्यात, तर कधी झाडांवर साप आढळून आले. त्यामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून संभाजी तारळे यांनी तब्बल 50 हून अधिक साप पकडून त्यांना जीवदान दिले. चिमट्याच्या सहाय्याने सापांना पकडून या सापांना सुरक्षित स्थळी सोडण्याचे काम त्यांनी केले आहे.

सर्पांचे रक्षण गरजेचे

साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्यामुळे आपण सर्पांना न मारता त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. साप कुणालाही मुद्दामून चावत नाही. तो त्याचे रक्षण करण्यासाठी विषाचा उपयोग करतो. त्यामुळे साप वाचविण्यासाठी सर्वांनी त्याला न मारता आपल्या 8208823857 या नंबरवर संपर्क करावे.

– संभाजी तारळे, सर्पमित्र, हेरवाड