संभाजीनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार गोकुळसिंग मलके यांचा 17 मतांनी पराभव केला. जंजाळ यांना 51 मते मिळाली, तर मलके यांना 34 मते पडली. या निवडणुकीत एमआयएमचे नगरसेवक फुटले.

भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मनपाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. उपमहापौर पदासाठी सात नगरसेवकांनी दहा नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती.  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे नगरसेवक एकत्रितपणे सभागृहात दाखल झाले.

हात उंचावून घेतले मतदान

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सर्वात अगोदर राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अपक्ष नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. जंजाळ यांना 51 मते मिळाली.