
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक वसाहतीतील हातमोजे बनविणार्या कंपनीत घडलेल्या भीषण अग्नितांडवात गाढ झोपेत असलेल्या 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर एका दीडवर्षीय चिमुकलीसह 11 कामगार किरकोळ भाजून जखमी झाले. ही खळबळजनक दुर्घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीत घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तीन तासानंतर आग आटोक्यात आणली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कंपनीमालकासह दोघांना अटक केली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने कामगार जगतावर शोककळा पसरली आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर सी-216, सनशाईन इंटरप्रायजेस या कंपनीत हॅण्डग्लोव्हज्सह इतर साहित्य बनविण्यात येते. त्यात 15 ते 20 कामगार काम करतात. या कामगारांसाठी राहण्याची सोय कंपनीमध्ये करण्यात आली होती. काम आटोपल्यानंतर कामगार नेहमीप्रमाणे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कंपनीतून अचानक धूर निघत असल्याने सुरक्षारक्षकाच्या कुटुंबातील महिलेने आपल्या लहान मुलांना उठवून आरडओरड करत कंपनीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीच्या खालच्या मजल्यावर आग असल्याने छताच्या दिशेने धाव घेतली आणि महिलेसह 11 जणांनी एका झाडाचा आश्रय घेऊन कंपनीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला.
तीन तासांनंतर आग आटोक्यात
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या दोन बंबांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने शहरातील अग्शिमन बंबाला पाचारण करण्यात आले. पाच बंबांच्या मदतीने अग्निशमन अधिकारी आर.एच. घरत, पी.के. चौधरी, के.टी. सूर्यवंशी, टी.एच. चंद, वाय.डी. काळे, पी.के. हजारे, एन.एस. पारखे, एस.डी. उकरे पाटील यांच्यासह जवानांनी तीन तास पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.
सहा जणांचा होरपळून मृत्यू
बिहारच्या मिर्झापूरमधील मोहम्म्द मुस्ताक मोहम्मद इब्राहिम (62), कौसर आलम जफिरूद्दीन (37) मोहम्मद एकबाल मोहम्मद एहरार (17), मोहम्मद मार्गब आलम साहबुद्दीन (32), बदनापूर तालुक्यातील रोषणगावमधील रियाज बशीर सय्यद (25) व बिहार राज्यातील जहानाबादमधील रामलाल रामविलास सिंदरीया (46) यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविले.
दीड वर्षाच्या चिमुकलीसह 11 जण भाजून जखमी
कंपनीत लागलेल्या भीषण आगीत भाजून तर काही जण जीव वाचविण्यासाठी बाहेर पडत असताना किरकोळ जखमी झाले. यात मोहम्मद इरशाद जफरोद्दीन आलम (28), मोहम्मद हैदर अब्दुल हय शेख (32), मोहम्मद मिसबाबुल मो. इस्लाम शेख (29), मोहम्मद दिनारूल मो. एहरार (20), मोहम्मद अफरोज मो. शोएब (23), दिलीपकुमार चंद्रिका मंडल (24), सुभाशिष हराधन हलदार (35), ठेकेदार मोहम्मद हसिनोमुद्दीन शेख, त्याची पत्नी इस्मतजहा (32), एक 5 वर्षांचा मुलगा व दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमींना पोलिसांनी घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचार करून घरी पाठवले.
झाडावरून उडी मारून वाचवला जीव
कंपनीत खाली मालाचा साठा होता. त्या ठिकाणी कच्च्या मालासह केमिकलचे ड्रमदेखील होते. वरच्या मजल्यावर कामगारांना राहण्याची सोय करण्यात आली होती. वर जाण्यासाठी एकच जिना होता. खालच्या गोडाऊनला आग लागताच वरच्या मजल्यावर झोपलेल्या मजूर कामगारांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना बाहेर पडता आले नाही. यात कामगारांनी झाडावरून उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. यात ते किरकोळ जखमी झाले.
सहायक पोलीस आयुक्तांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गौतम पातारे, ब्रह्म गिरी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहायक निरीक्षक गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथारकरांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
आगीचे कारण अस्पष्ट
ही आग नेमकी कशामुळे लागली, याबद्दल कुठलीच माहिती समजू शकली नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज प्रथमदर्शी वर्तविण्यात आला आहे.
कुत्र्याचाही होरपळून मृत्यू
कंपनीचे चोरट्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक कुत्रा पाळण्यात आला होता. या अग्नितांडवात त्या कुत्र्याचाही होरपळून मृत्यू झाला.
108 रुग्णवाहिका धावल्या
एमआयडीसीत आग लागल्याची माहिती मिळाली. तसेच या आगीत कामगारही अडकल्याचे समजताच 108 रुग्णवाहिकेपैकी वाळूज पोलीस ठाण्याचे डॉ. सुशील राऊत, मंगल राठोड, जिकठाण रुग्णालयाचे अनंत पाटील, मुसा शेख, भेंडाळा रुग्णालयाचे डॉ. विशाल आगळे, नितीन लांडगे, बन्सीलालनगरचे डॉ. काळे चंदन राजपूत तर सिल्क मिल कॉलनीतील डॉ. हर्षल कोठारी, फहीम खान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन होरपळलेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल केले.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पातारकरांचा खडा पहारा
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पातारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी अतिरिक्त बंब तसेच पाण्याच्या टँकरसह बंदोबस्ताची मोठी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सतर्कतेमुळे कंपनीलगत असलेल्या इतर कंपन्यांकडे ही आग पसरू नये, यासाठी त्यांनी चोख कामगिरी बजावली.
सहा जणांचा बळी घेणार्या कंपनीमालकासह दोघांना अटक
सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीतील कामगारांना त्यांचे जीवित व सुरक्षाविषयक आवश्यक ते नियम, कायदा, नियमावली व सुरक्षाविषयक कार्यप्रणालीबाबत हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून 6 कामगारांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याचे समोर आल्याने उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांच्या तक्रारीवरून कंपनीमालक बायजीपुरामधील साबेरखान शब्बीरखान पठाण आणि ठेकेदार मोहम्मद हसिनोमुद्दीन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

























































