तंजावरचे स्थलमहात्म्य- मराठय़ांपूर्वीचे तंजावर चोलमण्डलम्

>> प्रा. समीर जाधव

चोल राजा विजयलयाने इ.स. 850 मध्ये स्थानिक मुथरैयार सरदाराकडून तंजावर हा प्रदेश काबीज केला आणि त्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. पुढे ‘राजराज चोल पहिला’ ह्याने चोल साम्राज्याचा अधिक विस्तार केला. कला-संस्कृतीचे केंद्र असणाऱया तंजावरचा ग्रंथांमधील उल्लेख ‘चोलमण्डलम्’ असा आहे.

चोल राजा विजयलयाने इ.स. 850 मध्ये स्थानिक मुथरैयार सरदाराकडून तंजावर हा प्रदेश काबीज केला आणि त्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. आजही तंजावरला अद्यापि तद्देशीय ग्रंथामध्ये ‘चोलमण्डलम्’ असे म्हणतात. ‘विजयलय चोल’च्या कारकिर्दीनंतर चोल साम्राज्य ‘आदित्य पहिला’ आणि त्याचा उत्तराधिकारी ह्यांच्या हाती आले. ‘राजराज चोल पहिला’ ह्याने चोल साम्राज्याचा अधिक विस्तार केला. बृहदेश्वराचे मंदिर बांधले.

ह्या राजाने वास्तुकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटय़, चित्र आदी कलांना राजाश्रय दिला. यामुळे ह्या सर्व कला तंजावरमध्ये बहरास आल्या परिणामी तंजावर दक्षिण हिंदुस्थानात कला-संस्कृतीचे केंद्र बनले. मराठय़ांच्या काळात तंजावरची ख्याती अखंड भारतभर झाली हे विशेष लक्षणीय आहे. राजराज चोल पहिला हा चोल शासकांपैकी सर्वांत वैभवशाली शासक मानला जातो. राजराजा पहिल्याच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा राजेंद्र (1012-1044) याने चोळ साम्राज्याचा आणखी विस्तार केला. गंगा नदीपर्यंत पोहोचल्यामुळे राजेंद्र ‘गंगैकोंडा चोळ’ म्हणजेच गंगा जिंकणारा चोळ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानेच चोल साम्राज्याची राजधानी तंजावरहून गंगैकोंडाचोलपुरम या नवीन शहरात हलवली आणि इथूनच चोल साम्राज्याच्या ऱहासाला सुरुवात झाली.

‘राज राजा चोल तिसरा’ आणि नंतर त्याचा उत्तराधिकारी ‘राजेंद्र चोल तिसरा’ यांच्या काळात चोल साम्राज्य अशक्त होऊ लागले. त्यामुळेच तेराव्या शतकाच्या सुरुवातीस पांडय़ांनी चोल सत्ता काबीज केली. परंतु ‘विजयनगरच्या साम्राज्यविस्तारामध्ये तंजावर विजयनगरच्या अधिपत्याखाली आले. 1532 साली अच्युतराय याने सेवाप्पा याची नायक (राजकीय प्रतिनिधी) म्हणून नेमणूक केली. त्यानंतर तंजावर येथे नायक राजांची परंपरा निर्माण झाली. अच्युतरायच्या कारकीर्दीतच तालिकोटच्या युद्धात विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव झाला. परंतु तंजावरचे नायक त्यांच्या निष्ठेपासून कधीही दूर गेले नाहीत. सेवाप्पा, अच्युत (सेवाप्पाचा मुलगा), रघुनाथ (अच्युतचा मुलगा) हे पहिले तीन नायक राजे होत. रघुनाथ हा नायक शासकांपैकी महान शासक होता. त्याने मदुराईचा नायक, जिंजीचा शासक ह्यांचा पराभव केला.

सेवाप्पांनी गोविंदा दीक्षितांच्या अधिपत्याखाली स्थापन केलेल्या साहित्यिक परंपरा रघुनाथाच्या काळात फलद्रूप झाल्या.
1634 मध्ये रघुनाथच्या मृत्यूनंतर विजयराघव गादीवर बसला. त्याच्यावर मदुराईचे नायक आणि विजापूरचे सुलतान यांनी वारंवार हल्ले केले. मदुराईच्या चोक्कानाथ नायकाशी असलेल्या पारंपरिक वैरामुळेच तंजावरच्या विजयराघवने आपल्या कन्येचा विवाह मदुराईच्या चोक्का राजपुत्राशी लावून देण्यास नकार दिला. विजयराघवने लग्नास नकार देऊन केलेल्या अपमानाचा बदला म्हणून चोक्कानाथाने तंजावरवर हल्ला चढविला. ह्या लढाईत आपला पराभव होत आहे हे लक्षात आल्यावर विजयराघवनने आपला सर्व जनानखाना तोफांनी उडवून दिला आणि तो मृत्यूला सामोरा गेला. तंजावरवर विजय मिळवलेल्या राजा चोक्काने तंजावरचा प्रमुख म्हणून वडीलबंधू अलगिरी याची नेमणूक केली. विजयराघवनने जनानखाना उडवून देण्यापूर्वी त्याच्या पट्टराणीने आपला मुलगा चेंगमलदास याला एका दाईबरोबर दूर सुरक्षित स्थळी पाठवून दिले. विजयराघवचा चिटणीस असलेला रायसम वेकन्ना हा अलगिरीचा चिटणीस झाला.

अलगिरीच्या कारकिर्दीत या चिटणीसाला राज्यकारभारात स्वतंत्रपणे ढवळाढवळ करता येत नसल्याने त्याने विजयराघवचा मुलगा चेंगमलदासला वडिलोपार्जित गादीवर बसवण्याच्या घाट घातला. त्यासाठी त्याने आदिलशहाची मदत मागितली. आदिलशाहाने ही कामगिरी बंगलोरची जहांगिरी असलेल्या व्यंकोजी भोसले यांच्यावर सोपवली. व्यंकोजी शक्तिशाली सैन्यासह तंजावरला गेले आणि त्यांनी अलगिरीचा पराभव केला. अलगिरीला पदच्युत करून चेंगमलदासला तंजावरच्या गादीवर बसवून स्वारीचा खर्च गोळा करण्यासाठी व्यंकोजी तिरुमलवाडी येथे थांबले. परंतु तंजावरचा नायकराजा चेंगमलदासाने स्वारीचा खर्च दिला नाही. त्यातच तंजावर राज्यात राजकीय अस्थिरता ठाण देऊन होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन मराठय़ांनी तंजावर काबीज करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 12 जानेवारी 1676 मध्ये व्यंकोजीने तंजावर सर केले आणि काही कालावधीतच म्हणजे 5 मार्च 1676 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक केला.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]