समृद्धी महामार्गावर अपघात, एक ठार

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. यात 31 वर्षीय चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खलील ईस्माईल शेख असे मयत चालकाचे नाव असून तो धारावी, मुंबई येथील रहिवासी आहे.

सदर आपघाताबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मयत इसम खलील ईस्माईल शेख हा कार क्रमांक एम एच 01 इइ 3654 याने कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगाने जात असताना त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोर चालत असलेल्या अज्ञात वाहनास जोराची धडक दिली होती, त्यात तो गंभीर जखमी होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस, समृद्धी महामार्ग पोलीस समृद्धी महामार्ग आपत्कालीन क्यूआरव्ही सेवेचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत सदर गंभीर जखमी इसमास रुग्णावाहिकेतुन उपचारासाठी हलवले होते, मात्र तो उपचारापूर्वी मयत झाला. सदर अपघातग्रस्त वाहनास पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दूर करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

सदर अपघात प्रकरणी हसनेन अक्रम खान राहणार धारावी, मुंबई यांच्या फिर्यादिवरुन व पोलिसांनी सखोल चौकशी करून 1 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल केला असून अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करीत आहे.