राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणे विकृती, पंतप्रधानांचा निशाणा कुणावर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की आज संकष्ट चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण गणेश पूजन करतो. नागपुरात असल्यामुळे टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन, असे म्हणत मोदींनी आपल्या पुढील भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शॉर्टकटच्या राजकारणावर निशाणा साधला. मी महाराष्ट्र व देशातील लोकांना देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून सावधान करत आहे. शॉर्टकटच्या राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी ही विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्टकट घेणारे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणं हाच यांचा हेतू असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हिंदुस्थान पुढील 25 वर्षांचं धोरण समोर ठेवून काम करत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. देशात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. दुसऱ्या व तिसऱ्या वेळीही आपण मागे होतो. पण आज देशात चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, देश ही संधी गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही, शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. असे मोदी म्हणाले.