वाळू उत्खनन करणाऱ्या कामगारांकडून वीज चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity-1

सामना प्रतिनिधी, मालवण

कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांकडून कालावल हुरासवाडी येथे अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. याठिकाणी वीज वितरणने धडक कारवाई करत मुख्य वीज वहिनीला सुमारे सात ठिकाणी हूक सुरू असलेल्या वीज चोरीचा पर्दाफाश केला.

दरम्यान विद्युत वापरासाठी वापरण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. तर वीज चोरी करून वापरण्यात आलेल्या वीजे प्रमाणे संबंधितांना वीज बिल दिले जाणार असून ते न भरल्यास जमिन मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अशी माहिती आचरा विद्युत मंडळ प्रशासनाने दिली. कालावल खाडीपात्रात वाळूउत्खनन केले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आले असून खाडी किनारी झोपड्या उभारुन तेथे राहत आहेत. कालावल धामणे, हुरास कलम बागेत सुमारे दहा ते बारा झोपड्या उभ्या केल्या असून आंबा कलमांच्या वरून गेलेल्या विद्युत लाईनीला हुक टाकून वीज चोरी केली जात असल्याची माहिती विद्युत मंडळाला समजताच विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंता मुगडे, सहाय्यक अभियंता सोनाली माने, कर्मचारी पींटो साळकर, अल्पेश मो‌डक, नाईक फोरमन आदींनी कारवाई केली.

लाईनला टाकलेल हुक काढून घेत विद्युत वापरासाठी वापरण्यात आलेले बल्ब, एलीडी बल्ब, वायर आदी सामान जप्त करण्यात आले. या कारवाईवेळी वायंगणी सरपंच संजना रेडकर, पोलीस पाटील सुनील त्रिंबककर आदीं उपस्थित होते.

झोपड्या अनधिकृत – वायंगणी सरपंच रेडकर
वाळू उत्खनन करण्यास आलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी झोपड्या उभारण्याबाबत वायंगणी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याची माहिती वायंगणी सरपंच सौ संजना रेडकर यांनी दिली. त्यामुळे अनधिकृतपणे झोपड्या उभारुन विज चोरी सुरू असल्याचे स्पष्ट झाले.