वाळूतस्करांनी पोलीस कॉन्स्टेबलला टेम्पोखाली चिरडले; तिघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाळूमाफियांनी पोलीस कॉन्स्टेबलला टेम्पोखाली चिरडून ठार केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी-शिरशी रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश प्रभू सोनलकर (वय 32, रा. बुलेवाडी, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे.

मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर लोकअदालत असल्यामुळे समन्स बजावणीसाठी गेले होते. समन्स बजावून परतत असताना गुणेवाडीचे पोलीस पाटील, संजय मेटकरी यांना गोणेवाडी-शिरशी मार्गावरील हॅटसन डेअरीजवळ येण्यास सांगितले होते. या ठिकाणी वाट पाहात थांबलेले असताना समोरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो आला. सोनलकर यांनी या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता टेम्पोचालकाने थेट त्यांच्या अंगावरच गाडी घातली. यात सोनलकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर टेम्पोचालक व त्याचे दोन साथीदार फरार झाले होते. रात्री उशीरा त्यांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी पोलीस पाटील मेटकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. कॉन्स्टेबल सोनलकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.