
तिबेटच्या जिवंत सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरांचा अनोखा अनुभव देणाऱ्या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) येथे ग्यूमेड तांत्रिक मठ येथील भिक्षूंनी वाळू मांडळा (Sand Mandala) निर्मिती सादर केली.
CSMVS हिमालयन आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला संग्रहालयातील अभ्यागत, विद्यार्थी आणि कला-संस्कृती रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम केंद्रीय तिबेटी प्रशासन, धर्मशाळा येथील माहिती व आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या सहकार्याने साकारण्यात आला. रंगीत वाळूच्या कणांपासून अत्यंत संयम, एकाग्रता व ध्यानपूर्वक साकारण्यात येणारा वाळू मांडळा अनित्यता, करुणा आणि समरसतेचे प्रतीक मानला जातो. जे तिबेटी बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूलभूत मूल्य आहे. भिक्षूंनी सादर केलेली ही प्रक्रिया, मंत्रोच्चार आणि साधना पाहण्याची संधी अभ्यागतांना मिळाली, ज्यातून या आध्यात्मिक कला प्रकाराचे महत्त्व अधिक ठळकपणे समोर आले आहे.
या उपक्रमातून CSMVS ने जिवंत सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण करण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली असून, या संग्रहालयाला सक्रिय अध्ययन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अमूर्त वारशाच्या जतनासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून साकारले आहे.



























































