तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याचा वाळू व्यावसायिकांनी केला निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । मालवण

अनधिकृत वाळू उत्खनन-वाहतूकीवर कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे व तलाठ्यांवर हडी येथे हल्ल्याचा प्रयत्न झाला असेल तर ही घटना निषेधार्ह आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

मालवण शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गुरूनाथ पाटकर, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री, गुरूनाथ चव्हाण, दत्तप्रसाद भोवर, गणेश तोंडवळकर, संतोष पाटील, बंटी पेडणेकर, निलेश खोत, स्वप्नील मिठबावकर, देवेंद्र हडकर उपस्थित होते.

बेकायदेशीर आणि अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक बंदच व्हावी ही आमच्या सारख्या अधिकृतपणे लिलाव (टेंडर) प्रक्रियेत सहभागी होत लिलावाची वाट पाहणा-या व्यावसायिंकांची भूमिका आहे. ३ महिने उशिरा जाहीर झालेले वाळू लिलाव व गेली महिनाभर सुरू असलेली लिलाव प्रक्रिया यात वाळू व्यावसायिक भरडला गेला आहे. कर्जाचे डोंगर वाढल्याने कर्जबाजारी व उपासमारीची पाळी वाळू व डंपर व्यावसायिक यांच्यावर आली आहे. खाजगी व शासकीय बांधकांमानाही फटका बसला आहे. गवंडी व बांधकाम क्षेत्रातील अनेकांचे रोजगार ठप्प आहेत. असेही वाळू व्यावसायिकांनी सांगितले.

शासनाने जाहीर केलेल्या वाळू लिलाव (टेंडर) प्रक्रियेत सहभागी व्यावसायिकांनी वाळू उत्खनानासाठी रॅम्प बांधणे, होड्या खाडी पात्रात उतरवून डागडुजी, कामगार या सर्वाची व्यवस्था केलेली आहे. याची रीतसर नोंदणी प्रक्रियाही सुरू आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे अनधिकृत वाळू उत्खनन आमच्याकडून होत नाही. तरी अनधिकृत वाळू उत्खनन वाहतुकीवर कारवाई करताना महसूल प्रशासनाने लिलाव प्रक्रियेत सहभागी व्यावसायिकांच्या रॅम्प, होड्यांवर नाहक कारवाई होणार नाही याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

वाळू लिलाव (टेंडर) प्रक्रियेत सहभागी आम्ही वाळू व्यावसायिक लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहोत. लवकर वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण करून या व्यवसायावर अवलंबून सर्वानाच पुन्हा रोजगार प्राप्त करून घ्यावा. तसेच वाळू उत्खनन मुदत किमान ३० सप्टेंबर पर्यत करावी, अशीही मागणी करणार असल्याचे वाळू व्यावसायिकांनी स्पष्ट केले.