राहुरीत चंदनतस्करांची टोळी जेरबंद, 650 किलो चंदनासह 70 लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराज्य चंदनतस्कर टोळीला 650 किलो चंदनासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या ताब्यातून 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अब्दुल मोहम्मद निसाद (वय 32, रा. अंजामैल हाऊस, ता. बैदाडका, जि. कासारगुड, केरळ), अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय 41, रा. अमितकला हाऊस, ता. ऐनमाकजा, जि. कासारगुड, केरळ) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

केरळ राज्यातील चंदनतस्कर टोळी राहुरी हद्दीतून मध्य प्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुरी कारखाना येथे सापळा लावला. यावेळी पोलिसांनी आयशर टेम्पो पकडला. या टेम्पोत अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन (650 किलो) आणि 10 लाखांचे वाहन असा एकूण 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद आणि अब्दुल फक्रुद्दीन रहमान यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.