
>>संदीप वाकचौरे
वसईतील मुलीला 100 उठाबशा काढायला लावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने विद्यार्थी, पालक, शिक्षण, शिक्षा या सर्वांबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षेच्या भीतीने चूक पुन्हा होणार नाही हा विचार वरकरणी तर्कशुद्ध वाटला तरी भीतीतून निर्माण होणारी शिस्त ही बाह्य स्वरूपाची असते. तिचा अंतर्मनावर परिणाम फारसा होत नाही. म्हणूनच नव्या युगासोबत राहताना नवा विचार करण्याची आवश्यकता आहे.
शिक्षण क्षेत्रातून अलीकडील काळात सातत्याने काहीशा चिंताजनक घडामोडी समोर येत आहेत. अलीकडेच महाराष्ट्रातील वसई येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गात उशिरा आल्याच्या कारणास्तव शारीरिक शिक्षा म्हणून 100 उठाबशा काढण्यास सांगण्यात आल्या होत्या. या मुलीने पाठीवरील शालेय दप्तर कायम ठेवून ती शिक्षा पूर्ण केली. त्यानंतर ती आजारी पडली आणि उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तसेच यामुळे समाजमनामध्ये पुन्हा एकदा शिक्षणातील शिक्षेबद्दल पुनर्विचार करण्याची भूमिका प्रतिपादन केली जाऊ लागली आहे.
सध्याच्या काळात शिक्षणातील जुने विचार कालबाह्य ठरत आहेत. त्यामुळे शिक्षणातील शिक्षा या प्रकाराला अलविदा करायला हवे असा मतप्रवाह पुढे येत आहे. मात्र चुका केल्यानंतर शिक्षा केली नाही तर विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुधारणा होईल का? असा प्रश्न पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या समर्थकांकडून पुढे केला जातो. वस्तुत बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षेबद्दलचा दृष्टिकोन आणि पद्धती याबद्दल निश्चितपणे विचार करायलाच हवा. शिक्षा केल्यामुळे खरंच विद्यार्थी बदलतात का? गुणवत्तेत सुधारणा होते का? शिक्षेच्या भीतीने केल्या जाणाऱ्या अभ्यासाने मार्क मिळतात का? शिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विचारात खरोखर बदल होतो का? शिक्षकांना अशी जीवघेणी शिक्षा करावी असे का वाटते? यामागे विद्यार्थ्यांना समजून घेण्यामध्ये ते कमी पडत आहेत का? शिक्षा करण्यासंदर्भात कायद्यात तरतूद असतानाही शिक्षेचा बडगा का उगारावा लागतो? यांसारख्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह वसईतील घटनेच्या निमित्ताने नव्याने करण्याची गरज आहे.
कधीकाळी शिक्षणातून शिस्त, अभ्यास आणि मार्क यासाठी शारीरिक शिक्षा हा पर्याय निवडला जात होता. पालकांनाही शारीरिक शिक्षा केली तरी त्याचे काहीच वाटत नव्हते. आता शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या भूमिका बदलत चालल्या आहेत. समाजबदल गतिमान होत आहेत. पालकांची साक्षरता उंचावत आहे. शिक्षणाचा दृष्टिकोन केंद्रिभूत होतो आहे. शिक्षणविषयक पालकांची संवेदनशीलता अधिक वाढते आहे. त्याचबरोबर पाल्यांसंदर्भातील पालकांमधली नात्याची वीण अधिक घट्ट बनत चालली आहे. पूर्वी शिक्षकांबद्दल असलेला दृष्टिकोन सकारात्मक होता. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षा केली तर ते चुकणारच नाहीत ही पालकांची धारणा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना केल्या जाणाऱ्या शिक्षेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. आता पाल्यांविषयीची वाढलेल्या संवेदनशीलतेने पाल्यांना झालेली शिक्षा पालकांनादेखील असह्य करते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला रागावले, बोलले तरी शाळांसंदर्भात पारींचा पाढा वाचला जातो.
शिक्षेचे सर्वात जुने तत्त्वज्ञान भीतीवर आधारित आहे. चूक केली तर शिक्षा मिळेल आणि शिक्षेच्या भीतीने चूक पुन्हा होणार नाही हा विचार वरकरणी तर्कशुद्ध वाटतो. मात्र, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र दोन्ही दर्शवितात की, भीतीतून निर्माण होणारी शिस्त ही बाह्य स्वरूपाची असते. तिचा अंतर्मनावर परिणाम फारसा होत नाही, पण दुसरीकडे समाज, पालक, प्रशासन, शासन या सर्वांनाच शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हवे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजणे हे त्यांच्या भविष्यासाठी गरजेचे असते. मात्र त्यासाठी नव्या युगासोबत राहताना नवा विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी शारीरिक, मानसिक शिक्षेपेक्षा सकारात्मक शिक्षेचा विचार करता येईल का?
शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील नकारात्मकता वाढीला लागते. त्यातून बंडखोरीची क्षमता उंचावते. शिक्षणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागण्याची शक्यताही निर्माण होते. शिक्षण हे आनंददायी नाही, तर ते दुःखदायक आहे हा विचार मनात रुजवण्यासही कठोर शिक्षेची मदत होते. सबब, शिक्षा करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना समजून घेण्यामध्ये शिक्षक म्हणून कमी पडतो आहे का? याचा विचार करायला हवा. मुळातच शिक्षणाची व्यवस्था दिवसेंदिवस ताठर होत चालली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास उशीर होत असेल वा विद्यार्थी अभ्यास करत नसतील तर त्यामागे केवळ एकच कारण आहे असे नाही. पालकांमधील संघर्ष, कुटुंबातील वातावरण, पालकांची अर्थार्जनासाठीची धावपळ, वाढलेला पीन टाइम यातून विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये असलेली वृती कमी होत चालली आहे. त्याचाही मुलांच्या मानसिक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आहे.
खरं तर आजच्या काळात शिक्षक या प्रकारच्या भूमिका का घेतात? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांचे वाढते ताणतणाव, वाढलेली अशैक्षणिक कामे याबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. आज नव्या बदलांपासून आणि विचारधारेपासून शिक्षक दूर चालले आहेत. मार्कांची उंचावलेली अपेक्षा आणि सारे काही मार्कासाठी म्हणून शाळांचे प्रयत्न यामुळेदेखील यासारख्या घटना घडत आहेत. शिक्षा केल्यामुळेच विद्यार्थी बदलतात हा पारंपरिक दृष्टिकोन अजूनही बदलण्यास तयार नाही. त्यांच्या ताणतणावांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. आपण घटना घडल्यानंतर काही दिवस चर्चा करतो, पण पुढे काय?
वसईच्या प्रकरणात नेमके काय घडले आहे, हे पहावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडील काळात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा कल कमी होण्याची वृती कमी होत चालली आहे असे निरीक्षण बहुतांश शिक्षण क्षेत्रातील लोक नोंदवताना दिसत आहेत. विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत, स्वाध्याय सोडवत नाहीत. बाह्य प्रसार माध्यमांमुळे वर्गामधल्या वर्तनात बदल होतो आहे. त्यातून शिक्षकांना शिक्षा करण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो. अर्थात या सर्व बिकट वास्तवात शिक्षा काय असावी हे ठरवताना तिच्या परिणामकारकतेचा विचार प्राधान्याने करायलाच हवा. यासाठी शिक्षकांनी स्वतला संयमित करायला हवे. प्रसंगी पालकांशी संवाद साधण्याचा मार्ग सोपा आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 या कायद्यातील कलम 17 प्रमाणे शारीरिक अथवा मानसिक शिक्षा करण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानादेखील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शारीरिक शिक्षा करत असतील आणि त्यातून विद्यार्थिनीला मृत्यूला सामोरे जावे लागले असेल तर ती बाब अधिक चिंताजनक आहे. आता आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे. केवळ शिक्षकांनी यासंदर्भात विचार करावा असे नाही, तर पालकांनीदेखील मुलांच्या वर्तनाबाबत गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.
(लेखक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आहेत.)





























































