सांगली जिह्यातील ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिह्यातील 416 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीने एकतर्फी वर्चस्व मिळविले. वाळवा, शिराळा, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला. पलूस, कडेगाव तालुक्यांतील ग्रामपंचायतींवर माजी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. मिरज आणि आटपाडीमध्ये भाजपचे, तर खानापूर तालुक्यात शिंदे गटाने यश मिळविले. जतमध्ये भाजप आणि काही ठिकाणी स्थानिक आघाडय़ांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला. काही ठिकाणी सत्तांतर झाल्याने दिग्गजांना धक्का बसला, तर अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता राखण्यात नेत्यांना यश आले.

सांगली जिह्यातील दहा तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते. जिह्यातील 416 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक बिनविरोध झाल्या होत्या. दुपारी दोन वाजता वाळवा आणि जत तालुके वगळता ग्रामपंचायतींचे निकाल लागले. जिह्यातील 416 ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर स्थानिक आघाडय़ांनी ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळविली. वाळवा तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्यातील 60 ते 65 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. वाळव्यामध्ये दहा जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली. बोरगावमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील हे सरपंच म्हणून निवडून आले. मात्र, सत्ता राष्ट्रवादीला मिळाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कासेगावमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्या पॅनलने सरपंचांसह सदस्यांच्या सर्व जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडविला. कामेरीमध्ये राष्ट्रवादीचे नेते व माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील हे सरपंचपदी निवडून आले. शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटाने तब्बल 38 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या गटाला 16 ठिकाणी सत्ता मिळवण्यात यश आले. याशिवाय पाच ठिकाणी इतर आघाडय़ांना सत्ता मिळाली.

मिरज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नेते व जिह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने चांगला विजय मिळवला. माधवनगरमध्ये काँग्रेसचा सरपंच, तर सत्ता भाजपला मिळाली. सांबरवाडी, मानमोडी, सिद्धेवाडी, बेळंकी, टाकळी, बेडग, वटी, नरवाड, संतोषवाडी, गुंडेवाडी, बुधगाव बामनोळी, काकडवाडी व काननवाडी आधी गावांवर भाजपने झेंडा फडकविला. समडोळी, कसबे डिग्रज, सोनी, रसूलवाडी, कांचनपूर, जानराववाडी या गावांमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पदमाळेमध्ये काँग्रेसने सत्तांतर घडवले. दुधगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्ता काबीज केली.

जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला संमिश्र यश मिळाले. काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गटाला 20 ग्रामपंचायतींत यश मिळाले. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटाने तितक्याच जागा मिळाल्याच्या दावा केला आहे. उमदी, माडग्याळ, मुचंडी येथे भाजपने सत्तांतर घडविले. सोन्या जाडरबोबलाद, बाज येथील सत्ता कायम राहिली, तर डफळापूर, कुंभारी, रामपूर, दरी, कुन्नूर आदी गावांवर काँग्रेसने झेंडा फडकवला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी संखचा गड पुन्हा काबीज केला.

खानापूर तालुक्यात आमदार अनिल बाबर यांच्या गटाने 28 ग्रामपंचायतींची सत्ता मिळवली. राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाला 18, तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाला पाच ठिकाणी यश मिळाले.

पलूस-कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला. भाजपचा धुव्वा उडाला. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. पलूस तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने यश मिळवले. भाजपला एक, तर स्थानिक आघाडय़ांनी तीन ग्रामपंचायतींवर यश मिळवले. कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला. 43 ग्रामपंचायतींपैकी 34 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने विजयाचा दावा केला.

तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळविले. 24 ग्रामपंचायतींपैकी 13 राष्ट्रवादीला मिळाल्या. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या गटाला नऊ ग्रामपंचायतवर सत्ता प्रस्थापित केली, तर इतर आघाडय़ांनी तीन ठिकाणी यश मिळविले. कवठेमहांकाळ तालुक्यांतील 29 ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने 15 ठिकाणी सत्ता मिळवली. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाने 7 आणि भाजपने 3 ठिकाणी सत्ता मिळवली, तर स्थानिक आघाडय़ांना दोन ठिकाणी सत्ता मिळविण्यात यश आले.