सांगलीत 3 किलोमीटरवर कृष्णेचे पाणी, शहरातील अनेक भागात जलमय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णा नदीची पाणीपातळी 52 फुटांपेक्षा जास्त जाणार नाही, हा पाटबंधारे विभागाचा अंदाज खोटा ठरवत कृष्णेने तब्बल 55 फुटांपर्यंत मजल मारल्याने नदीपात्रापासून सुमारे तीन किलोमीटर सांगली शहर परिसरात महापुराचे पाणी घुसले आहे. दोन ते आठ फुटांपर्यंत पाणी साचून राहिल्याने शहराला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यात दोन दिवसांपासून वीज आणि पाणी नसल्याने नागरिकांची दैना उडाली आहे. सायंकाळी चारनंतर कृष्णेची पाणीपातळी स्थिर आहे. रात्रीपासून पाणी उतरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

धरणक्षेत्रात कमी झालेला पाऊस आणि कोयना, वारणा धरणांतून सोडण्यात येणाऱया पाण्यात मोठी कपात केल्याने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ थांबेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला होता. मात्र, तासागणिक पाणीपातळीत होणारी वाढ पाहून सांगलीकर हवालदिल झाले. शनिवारी रात्री 50 फुटांवर असणारी पाणीपातळी काल दुपारी 55 फुटांवर पोहोचली. दुपारनंतर ही पाणीपातळी स्थिर आहे. मात्र, अद्याप पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली नाही. रात्रीपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

2005 आणि 2019च्या महापुरापेक्षा या महापुराचा कृष्णाकाठी आणि सांगली शहराला मोठा फटका बसला. सांगली शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. 2 ते 8 फूट पाणी साचले आहे. सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती मंदिरही पाण्याखाली गेले आहे. गणपती पेठ, सराफ कट्टा, मेन रोड, कापड पेठ, मारुती रोड, हरभट रोड, गवळी गल्ली, शिवाजी मंडई, महापालिका परिसर, राजवाडा चौक, बसस्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खणभाग, स्टेशन रोड, मीरा हौसिंग सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, सर्किट हाउस परिसर, वखार भाग, सांगली हायस्कूल, कॉलेज कॉर्नरपर्यंत पाणी घुसले आहे. आज सकाळपासून एनडीआरएफची पथके आणि स्थानिक मंडळी बोटी, नावेतून पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत होते. शहरात सगळीकडे पाणीच पाणी असताना खंडित वीजपुरवठय़ामुळे काही नागरिकांना प्यायलाही पाणी नव्हते.

या महापुराचा तडाख्यात सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील 104 गावांतील जवळपास 20 हजार हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने ऊस, भाजीपाला, केळी, सोयाबीन, भुईमूग या पिकांचा समावेश आहे. कृषी विभागाने 72 तासांत नुकसानीची आकडेवारी संबंधित विमा कंपनीला कळविण्याचे बंधन आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.

महापुराच्या विळख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील 104 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यातील 52 गावांतील पूर्ण, तर 42 गावांचा अशंतः वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

पाणीपातळी संथ गतीने उतरेल – जिल्हाधिकारी

कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा पूल, कराड, बहे पूल, ताकारी पूल व भिलवडी पूल येथील पाणीपातळी कमी झालेली आहे. आयर्विन पूल सांगली येथील पाणीपातळी दुपारी 1 वाजता 54.6 इतकी झालेली होती. सध्या ती स्थिर होत असून, वारणा धरणातून विसर्ग कमी करून तो 8 हजार 720 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. विसर्ग निर्गमित होण्यास खालील बाजूच्या विसर्गामुळे वेळ लागणार असल्याने संध्याकाळपर्यंत पाणीपातळी स्थिर राहून संथगतीने उतरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

नागरिकांनी सुरक्षितस्थळी पोहचावे – महापौर

सांगली, मिरजेत पाणीपातळी स्थिर असली तरी अनेक ठिकाणी नागरिक अडकून आहेत. त्यांना सुखरूप आणण्यासाठी सांगलीच्या स्टेशन चौकात महापालिकेच्या बोटींचे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, येथून अग्निशमन अधिकारी आणि त्यांची टीम नागरिकांना मदतकार्य करेल.  पाणी आलेल्या भागातील नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने बाहेर पडावे आणि सुरक्षितस्थळी पोहोचावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.