
तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला आहे. धारदार शस्त्राने वार करून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याचा प्रकार पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे घडला. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत, तर अन्य चौघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हा खुनी हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत.
दुधोंडी येथील या मृत कुटुंबाशी संबंधित एका मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याविषयी यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यातूनच काल रात्रीही या दोन कुटुंबांत वाद झाला होता. मात्र, पोलिसांनी हा वाद मिटविला होता. तरीही रविवारी विजय मोहिते, हिंमत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते हे जागीच ठार झाले, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
या घटनेने दुधोंडी परिसर हादरला आहे. पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. एका वेळी तिघांची हत्या करण्याची घटना घडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावात तणावसदृश परिस्थिती असली, तरी पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

























































