
संगमेश्वर तालुक्यातील लोवले ग्रामपंचायत क्षेत्रात डेल्टा प्लसचे दोन नवीन रूग्ण सापडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे . जिल्ह्यात पुन्हा एकदा डेल्टा प्लसचे रूग्ण सापडण्यास हळुहळू सुरूवात होऊ लागली आहे . मात्र हे दोन्ही रुग्ण जून महिन्यात कोरोनाबाधीत झाले होते . त्यांचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आणि ते डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले .
लोवले मयुरबाग येथील 42 वर्षीय दोन्ही नागरिक जून महिन्यात कोरोनाबाधित सापडले होते. नियमित उपचारानंतर प्रकृती सुधारताच दोघांनाही रूग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता पुणे शहरातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे ( एनआयव्ही ) आरोग्य विभागामार्फत पाठविण्यात आले होते. या दोन्ही नागरिकांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे एनआयव्ही संस्थेमार्फत आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे . जून महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील माभळे , कसबा , नावडी , धामणी ग्रामपंचायत क्षेत्रात डेल्टा प्लसचे एकूण 9 रूग्ण सापडले होते . एका 82 वर्षीय डेल्टा प्लस वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
जिल्हा प्रशासनाने या चारही ग्रामपंचायत परिसरात दोन आठवड्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्रासंबंधितचे ( कंटेनमेंट झोन ) आदेश बजावले होते . सलग पंधरा दिवस या चारही ग्रा.पं. क्षेत्रातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या . लोकप्रतिनिधींच्या आग्रही भूमिकेनंतर कंटेनमेंट झोनचे आदेश रद्द करण्यात आले होते . लोवले ग्रा.पं. क्षेत्रात कोणत्याही क्षणी कंटन्मेंट झोनचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे . आरोग्य विभागामार्फत 117 कोरोनाबाधितांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. यापैकी नेमके किती बाधित डेल्टा प्लसचे रूग्ण आहेत , याचा तपशील आरोग्य विभागाने अद्यापपर्यंत अधिकृतपणे जाहीर केलेला नसल्याने संभ्रमावस्था वाढली आहे .

































































